तनिष्क कधी पडला समजलेच नाही!

By Admin | Published: June 27, 2017 02:02 AM2017-06-27T02:02:51+5:302017-06-27T02:02:51+5:30

‘तनिष्क पाय घसरून कधी पडला कळलेच नाही. त्याला वाचविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरत होते.

Tanishq did not understand when it ever happened! | तनिष्क कधी पडला समजलेच नाही!

तनिष्क कधी पडला समजलेच नाही!

googlenewsNext

गौरी टेंबकर-कलगुटकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘तनिष्क पाय घसरून कधी पडला कळलेच नाही. त्याला वाचविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरत होते. त्यामुळे मी माझ्या घरच्यांना फोन केला. त्यांनीच मला पोलिसांकडून मदत मागण्याचे सुचवले आणि सुरू झाला मृत्यूचा थरार.’ हा अनुभव आहे मंजीत ठाकूरचा. मंजीत माणगावला पावसाळी सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक आहे.
ठाण्याला राहणारा मंजीत हा माटुंग्याच्या एका कॉलेजमधून बीएमएसच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. त्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी एकदा तो माणगावच्या भीरा गावातील कुंड पाहून आला होता. तेव्हा फारसा पाऊस नव्हता. त्यामुळे या वर्षी मित्रांना घेऊन या ठिकाणी जाण्याचे त्याने ठरविले.
सकाळी आठच्या दरम्यान ते कुंडाच्या ‘स्टार्टिंग पॉइंट’ला पोहोचले. एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि पुढे निघाले. तेव्हादेखील जास्त पाऊस नव्हता. मात्र आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसा पावसाचा जोर वाढू लागला. आम्ही पूर्ण भिजून चिंब झालो होतो, त्यातच खाण्याचे सामानही संपत आले. पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे अखेर आम्ही कुंडापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे लक्षात आले आणि माघारी परतण्याचे ठरविले, असे मंजीतने सांगितले. येताना जो ओढा आम्ही सहज पार केला तोच ओढा परतत असताना तुडुंब भरून वाहू लागला. त्यातच आमचा मित्र तनिष्क पाय घसरून ओढ्यात कधी पडला ते मला समजलेच नाही. ते पाहून सोबतच्या मुली घाबरल्या. मात्र तनिष्कला पोहता येत असल्याने तो कसाबसा हातपाय मारत ओढ्याच्या पलीकडे गेला.
ओढ्याच्या पाण्याने पातळी गाठली होती. त्यामुळे तनिष्क बराच वेळ तेथे अडकला होता. त्यातच तो थोडाफार जखमीदेखील झाला होता. आमच्याकडे असलेले बिस्कीट, ओआरएसचे पाणी, चॉकलेट्स आम्ही त्याला पुरविले. त्यानंतर आमच्या सोबत असलेल्या स्थानिक गाइड्सना आम्ही तनिष्कला अलीकडे आणण्यासाठी मदत मागितली. मात्र त्यांनी बनवलेली योजना फारशी न रुचल्याने मी माझ्या घरच्यांना फोन केला आणि सर्व काही सांगितले. तेव्हा त्यांनीच मला पोलिसांची मदत घेण्याचे सुचविले आणि ती मदतच महत्त्वाची ठरली, असे मंजीतने सांगितले.
मी माणगाव पोलिसांना फोन केला. तेव्हा त्यांनी आम्हाला धीर देत लगेचच घटनास्थळी धाव घेतली. ज्यात पोलीस अधिकारी नवनाथ जगताप होते. त्यांनी सोबत रोप आणि बचावकार्यासाठी आवश्यक असलेली साधने आणली होती. सर्व मुलांचे मनोधैर्य वाढवत तनिष्कसह त्यांनी सर्वांना बाहेर काढले.
भुकेने व्याकूळ झाल्याने आम्हाला त्यांनी जेवायला पाठवून दिले. तेव्हा कधी एकदा मुंबईला परततो आणि पालकांना भेटतो असे आम्हाला वाटत होते. मान्सून सुरू झाल्याने अशा अनेक सहली अनेक ठिकाणी निघतील. मात्र त्यापूर्वी योग्य नियोजन आणि काही संकट आल्यास मदत मिळण्याची सोय नक्की पाहा, अशी विनंती मंजीतसह सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

Web Title: Tanishq did not understand when it ever happened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.