मुंब्य्रात घरांवर टँकर कोसळून दोघे ठार
By admin | Published: June 12, 2014 03:11 AM2014-06-12T03:11:52+5:302014-06-12T03:11:52+5:30
रसायनाने भरलेला टॅँकर मुंब्रा बायपासजवळील २५० फूट खाली चार घरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला,
मुंब्रा : रसायनाने भरलेला टॅँकर मुंब्रा बायपासजवळील २५० फूट खाली चार घरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. बुधवारी सकाळी ७.१५ वाजता झालेल्या या अपघातात तीन मुले तसेच तीन महिला जखमी झाल्या. चार घरे उद्ध्वस्त झाली.
ठाण्याहून पनवेलच्या दिशेने इथॉइल नायट्रेट रसायन घेऊन जाणारा टॅँकरचालक कैलासनगर वसाहतीच्या वरच्या बाजूला थांबण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्या वेळी त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो २५० फूट खाली घरांवर कोसळला. या घटनेत चारही घरांचे मोठे नुकसान झाले. त्यात माधवी हळदे (१५) या वर्षी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीसह हरी चव्हाण यांचा मृत्यू झाला. भारती हळदे (३९), प्रियंका हळदे (१८), मनिलाल पाल (४९, टॅँकरचालक), सुलोचना म्हात्रे (६०), रंगाबाई म्हात्रे (७०) तसेच भास्कर हळदे (४०), शिवाजी दाभाडे (३६), तेजस दाभाडे (४), रूपाली दाभाडे (११) हे जखमी झाले आहेत. (वार्ताहर)