टँकर लॉबीमुळे दुष्काळ!
By admin | Published: April 19, 2016 04:32 AM2016-04-19T04:32:56+5:302016-04-19T04:33:05+5:30
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मिळून ६५०० टँकर चालत आहेत. या टँकर्सना कोठून पाणी मिळते, असा सवाल करत राजकारण्यांच्या ताब्यातील टँकर आणि छावण्या लॉबीनेच
मुंबई : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मिळून ६५०० टँकर चालत आहेत. या टँकर्सना कोठून पाणी मिळते, असा सवाल करत राजकारण्यांच्या ताब्यातील टँकर आणि छावण्या लॉबीनेच दुष्काळ तीव्र केल्याचा आरोप महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला.
लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे काम १५ दिवसांत पूर्ण केले, तेच काम तेथील राजकीय नेत्यांना एवढ्या वर्षांत का शक्य झाले नाही, असा सवाल करत खडसेंनी लातूरच्या तत्कालीन नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश केला. ते म्हणाले, लातूरपासून जवळच असणाऱ्या निम्म तेरणा धरणात पाणी आहे. ते पाणी तेथून लातूरला नेण्यासाठी बेलकुंड येथील फिल्ट्रेशन प्लॅन्ट चालू करणे आवश्यक होते. पण गेली अनेक वर्षे तो बंद पडून होता. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडून ही माहिती मिळताच आपण विशेष बाब म्हणून २ कोटी रुपये मंजूर केले. (विशेष प्रतिनिधी)लातूर महापालिकेच्या उपायुक्तांकडे बेलकुंडच्या फिल्ट्रेशन प्लॅन्टसाठी ब्लिचिंग पावडरची मागणी करण्यात आली होती; मात्र प्लॅन्ट लातूर महापालिकेच्या हद्दीत नाही, त्यामुळे आम्हाला पावडर देता येणार नाही, असे सांगून पावडर देण्यास उपायुक्तांनी नकार दिला होता, असेही खडसे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक : २४ तासांच्या लाइनसाठी महावितरणला ३० लाख रुपये दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या १५ दिवसांत तो प्लॅण्ट चालू केला. आज तेरणातून ५० लाख लीटर व मिरजेहून जलदूत रेल्वेद्वारे ५० लाख लीटर पाणी सुरू झाले आहे. जळकोटजवळून तीन दिवसांनी एकदा १५ ते १६ लाख लीटर पाणी मिळेल अशी व्यवस्था लवकरच सुरू होत आहे, असेही खडसेंनी सांगितले.