नारळ वाढवण्यासाठी टँकर ताटकळले!
By admin | Published: May 5, 2016 01:39 AM2016-05-05T01:39:12+5:302016-05-05T01:39:12+5:30
आठवडाभरापासून बहुप्रतिक्षित असलेले टँकर अखेर बुधवारी शहरात दाखल झाले खरे; मात्र नारळ वाढवून (फोडून) पाणी टँकरमध्ये भरण्याच्या अट्टहासापोटी दोन तास टँकर तलावातच
- चेतन धनुरे , उदगीर (जि. लातूर)
आठवडाभरापासून बहुप्रतिक्षित असलेले टँकर अखेर बुधवारी शहरात दाखल झाले खरे; मात्र नारळ वाढवून (फोडून) पाणी टँकरमध्ये भरण्याच्या अट्टहासापोटी दोन तास टँकर तलावातच ताटकळले़ परिणामी सहा टँकरची प्रत्येकी एक खेप कमी झाली़ म्हणजेच तब्बल १ लाख ४० हजार लिटर्स पाणी आणता आले नाही़
उदगीरमध्ये घेतलेल्या बैैठकीत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी शहरासाठी १० टँकरने दररोज १० लाख लिटर्स पाणी वागदरीतून आणण्याचा निर्णय जाहीर केला़ बुधवारच्या मुहूर्ताला पहाटे नांदेड व लातूरहून प्रत्येकी ३ टँकर दाखल झाले़ सकाळी वागदरीच्या तलावात सहा टँकर तलावावर पोहोचले़ यंत्रणा तयार होती़ विद्युतपुरवठाही ८ वाजेपासूनच सुरू करण्यात आला होता़
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसीलदार तलावावर येणार असल्याची चर्चा सुरू झाली़ त्यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून व कळ दाबून पाणी भरण्यास सुरुवात होईल, या प्रतिक्षेत तासभर टँकर थांबून राहिले़ मान्यवरांना वेळ लागत असल्याने तलावावरील अभियंत्यांनी ते येईपर्यंत टँकर भरुन घेता येईल, या विचाराने १०़०३ वाजता पहिला टँकर भरण्यासाठी फिलिंग पॉर्इंटवर लावला. १०़३४ वाजेपर्यंत ४ टँकर भरले़ तेवढ्यात नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे आले़ त्यांनी नारळ वाढवला. या संपूर्ण प्रक्रियेअंती ११़१६ वाजता पहिला टँकर बाहेर पडला़ या सहा टँकरद्वारे एकूण १ लाख ४० हजार लिटर्स पाणी बनशेळकीच्या फिल्टर आणण्यात आले़