तान्हुली बनली ‘राणी’
By admin | Published: January 19, 2015 10:35 PM2015-01-19T22:35:24+5:302015-01-19T22:35:56+5:30
शासकीय रुग्णालयात नामकरण : म्हसवड येथील शिशुगृहात रवानगी
सातारा : भरतगावनजीक रविवारी दुपारी एका खड्ड्यात आढळून आलेली आठ महिन्यांची तान्हुली सोमवारी बोरगाव पोलीस ठाण्यातील महिला हवालदार अश्विनी माने यांच्याजवळच होती. जिल्हा रुग्णालयातील अकरा नंबरच्या कक्षात येणाऱ्या प्रत्येकाकडे पाहून डोळे मिचकावत होती. स्मितहास्य करून त्यांना प्रतिसाद देत होती. याचवेळी येथील नर्स तिला चमचाने दूध पाजत होत्या. त्यांनाही ती प्रतिसाद देत होती. विशेष म्हणजे, तिचे नामकरणही येथील नर्सेसनी ‘राणी’ असे करूनही टाकले. दरम्यान, या तान्हुलीला रात्री म्हसवड येथील शिशुगृहात दाखल करण्यात आले.
पुणे-बंगलोर महामार्गालगत असणाऱ्या भरतगाव येथे पल्स पोलिओ मोहीम लसीकरण धूमधडाक्यात सुरू असतानाच दुसरीकडे रस्त्याच्या एका कडेला एक तान्हुली जीवाच्या आकंताने रडून-रडून थकली होती. मात्र, तिची हाक कोणालाच ऐकू आली नाही. याचवेळी ही माहिती भरतगावचे पोलीस पाटील प्रताप शंकर शेलार यांना कोणीतरी याची माहिती दिली आणि त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहिलेले दृष्य अतिशय विदारक होते. बाभळीच्या काट्यावर अलगदपणे टाकून दिलेली ही मुलगी अगदी निपचिप पडली होती. याची माहिती तत्काळ बोरगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एम. भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी तान्हुलीचा जीव अगदी कासावीस झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ तिला नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, येथे तिच्या प्रकृतीत फारसी सुधारणा होणार नसल्याचे लक्षात घेता तिला तत्काळ सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि येथे तिच्यावर उपचार सुरू केले. येथे आल्या-आल्या परिसेविका रेखा भोसले यांनी तिचे वजन केले तर ते साडेपाच किलो भरले. प्रत्यक्षात ते आठ किलो हवे होते. यावेळी तिला छोट्याशा ग्लासमधून दूध पाजले. तिचा आवाज बसला होता. तोंडाला आणि पायाला माती लागली होती. यानंतर तिला तत्काळ येथे पोलिओ डोस देण्यात आला. (प्रतिनिधी)
आठ महिन्यांची तान्हुली आमच्या कक्षात आली, त्यावेळी ती थोडी घाबरल्यासारखी वाटत होती. तिचे वजन केले असता तेही कमी भरले. तिचा आवाज बसला आहे. तिची प्रकृती सुधारण्यावर आणखी भर द्यावा लागणार आहे.
- रेखा भोसले, परिसेविका
आम्ही अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिला फेकून देणाऱ्याचा शोध आम्ही घेत आहे. मात्र, जोपर्यंत तिचे आई-वडील सापडत नाहीत, तोवर तिला सुरक्षितस्थळी ठेवावे लागणार आहे. तिला म्हसवड येथील शिशुगृहात दाखल केले आहे.
- व्ही. एम. कदम, एपीआय
थंडी वाजल्यानंतर स्वेटरची व्यवस्था
तिला थंडी वाजत होती. यानंतर येथील परिसेविकांनी तिला तत्काळ एका स्वेटरची व्यवस्था केली. यानंतर ती झोपी गेली. येथे तिची सेवा करण्यात डॉ. अरुंधती कदम, डॉ. अरुण जाधव त्याचबरोबर संध्या करपे, सीमा भोसले, अल्का बडेकर, महिला हवालदार अश्विनी माने आदी मग्न होते.