मुंबई मॅरेथॉनमध्ये टांझानिया, केनियाचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 04:30 AM2017-01-16T04:30:27+5:302017-01-16T04:30:27+5:30

मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे टांझानिया आणि केनियाच्या धावपटूंचा दबदबा राहिला

Tanzania, Kenya dominate the Mumbai Marathon | मुंबई मॅरेथॉनमध्ये टांझानिया, केनियाचा दबदबा

मुंबई मॅरेथॉनमध्ये टांझानिया, केनियाचा दबदबा

Next

रोहित नाईक, मुंबई
मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे टांझानिया आणि केनियाच्या धावपटूंचा दबदबा राहिला, तर भारतीय पुरुषांमध्ये लष्कराच्या धावपटूंचे निर्विवाद वर्चस्व राहिले. आॅलिम्पियन खेता राम, बहादूरसिंग धोनी आणि टीएच संजित लुवांग यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकावर नाव कोरले. त्याच वेळी भारतीय महिला गटात महाराष्ट्राच्या ज्योती गवतेने एकहाती वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण पटकावले. पश्चिम बंगालची श्यामली सिंग व पहिल्यांदाच मुख्य मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेली लेह-लडाखची जिगमेट डोल्मा यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
यंदा धावपटूंच्या कामगिरीवर हवामानाचा बराच परिणाम झाला. पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुषांची स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाली. विजेत्या खेतारामने २ तास १९ मिनिटे ५१ सेकंदाची वेळ देत शर्यत पूर्ण केली, तर बहादूरसिंग धोनीने २ तास १९ मिनिटे ५७ सेकंदाची वेळ दिली. संजित लुवांगने २ तास २१ मिनिटे १९ सेकंदाच्या वेळेसह कांस्य पटकावले. जवळजवळ ३० किमी अंतरापर्यंत तिन्ही विजेते धावपटू एकत्रित होते. मात्र, नंतर खेतारामने वेग वाढवत काहीशी आघाडी मिळवली. अखेरच्या ३ किमीमध्ये धोनीने वेग वाढवताना खेतारामला गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु अनुभवाच्या जोरावर खेतारामने आपली आघाडी कायम राखत बाजी मारली.
महिलांमध्ये महाराष्ट्राची अनुभवी धावपटू ज्योती गवातेने अपेक्षित वर्चस्व राखले. तिने २ तास ५० मिनिटे ५३ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवताना सहज बाजी मारली. विशेष म्हणजे, द्वितीय स्थानी राहिलेल्या बंगालच्या श्यामली सिंगला तिने तब्बल १५-१६ मिनिटांनी पिछाडीवर टाकले. श्यामलीने ३ तास ८ मिनिटे ४१ सेकंदाची वेळ दिली, तर पहिल्यांदाच मुख्य मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या जिगमेट डोल्माने लक्षवेधी कामगिरी करताना ३ तास १४ मिनिटे ३८ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना कांस्य पदक पटकावले.
मुख्य मॅरेथॉनमध्ये टांझानियाचा अल्फोन्स सिंबू व केनियाची बॉर्न्स कितूर यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात बाजी मारली. सिंबूने संथ सुरुवातीनंतर २७ किमीनंतर वेग वाढवताना निर्णायक आघाडी घेतली. दुसऱ्या स्थानी राहिलेल्या केनियाच्या जोशुआ कोपकोरिर व सिंबू यांच्यामध्ये अटीतटीची स्पर्धा रंगली.
मात्र, अखेरच्या ५ मिनिटांमध्ये वर्चस्व राखताना सिंबूने बाजी मारली. सिंबूने २:०९:३२ अशी वेळ नोंदवली, तर जिशुआने २:०९:५० अशी वेळ दिली. केनियाच्याच इलियुड बरंगेट्युनी याने २:१०:३९ अशा वेळेसह कांस्य पटकावले.
महिलांमध्ये कितूरने २:२९:०२ अशी वेळ नोंदवत सहज सुवर्ण पदक पटकावले. कितूरच्या वेगापुढे निभाव न लागलेल्या चाल्तू ताफा (२:३३:०३) आणि तिगिस्ट गिरमा (२:३३:१९) या इथिओपियाच्या धावपटूंना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
>कामगिरीत सातत्य राखल्याचा आनंद आहे. खूप चांगचे आव्हान मिळाले. अटीतटीची शर्यत झाली, पण जिंकण्यात यशस्वी झाल्याचा आनंद आहे.
- खेता राम, विजेता भारतीय पुरुष पूर्ण मॅरेथॉन

मी या स्पर्धेसाठी चांगली तयारी केलेली. त्यामुळे जिंकण्याचा आत्मविश्वास होता. खेतारामसोबतच धावत होतो, परंतु अखेरच्या ३ किमीमध्ये त्याने वेग वाढवला. मी त्याला गाठण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.
- बहादूरसिंग धोनी, द्वितीय - भारतीय पुरुष पूर्ण मॅरेथॉन

माझी सुरुवात संथ झाली. ३७ किमीपर्यंत मी ७व्या स्थानी होतो. यानंतर वेग वाढवून तिसरे स्थान मिळवले. गतवर्षी मी ७वे स्थान मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या कामगिरीचा आनंद आहे, परंतु पुढच्या वेळी याहून अधिक चांगली कामगिरी करेन.
- संजित लुवांग, तृतीय - भारतीय पुरुष पूर्ण मॅरेथॉन

Web Title: Tanzania, Kenya dominate the Mumbai Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.