तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणाचे विकृत चाळे
By admin | Published: July 13, 2017 05:35 AM2017-07-13T05:35:51+5:302017-07-13T05:35:51+5:30
बोरीवलीपाठोपाठ तपोवन एक्स्प्रेसमध्येही तरुणीला पाहून हस्तमैथुन करण्याचा प्रकार घडला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवलीपाठोपाठ तपोवन एक्स्प्रेसमध्येही तरुणीला पाहून हस्तमैथुन करण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तब्बल १३ दिवसांनंतर या प्रकरणाला सोशल मीडियातून वाचा फोडण्यात आली. हा व्हिडीओ रेल्वे पोलिसांच्या निदर्शनात येताच, अवघ्या सहा तासांत त्यांनी अशोक प्रधान (२०) या विकृत तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
सीएसटीएम स्थानकांवर २९ जून रोजी पहाटे ५.४५ वाजता तक्रारदार तरुणी मैत्रिणीसह तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणार होती. ट्रेन सुटण्यास अवधी असल्याने फलाटावर कोणीही प्रवासी नव्हते. मैत्रिणीची वाट बघत ती एकटीच फलाटावर थांबली. याच संधीचा फायदा घेत, अशोकने अश्लील चाळे करत, हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, तरुणीने दुसरीकडे पळ काढला. मात्र,तेथेही अशोकची विकृती सुरू होती. तरुणीने पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, पोलिसांनीही तिला मदत करण्याऐवजी दुसरीकडे बसण्याचा सल्ला दिला. तरुणीने हा सारा प्रकार मोबाइलमध्ये कैद केला. बुधवारी तब्बल १३ दिवसांनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. सर्व स्तरांतून त्याचे तीव्र पडसाद उमटले. या व्हिडीओची दखल घेत, रेल्वेचे अपर पोलीस महासंचालक जय जीत सिंह यांनी संबंधितांना तपासाचे आदेश दिले. व्हिडीओमुळे जाग आलेल्या तपास यंत्रणेने स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सुरुवात केली. त्यातून अशोकची माहिती समोर येताच, त्याला अवघ्या सहा तासांत बेड्या ठोकण्यात आल्या. अशोकला विनयभंग आणि गैरवर्तनप्रकरणी अटक केली.
मूळचा ओरिसामधील भुवनेश्वरचा रहिवासी असलेला अशोक चेंबूरच्या माहूल गावात राहतोे. या प्रकरणी सीएसटीएम लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती सीएसटीएम लोहमार्ग पोलिसांनी दिली.
>पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार
तरुणाचे हे वागणे लज्जास्पद आहे. या घटनेवर रेल्वे सुरश्रा बल आणि रेल्वे पोलीस दल या दोन्हींकडून जलद कृती करणे अपेक्षित आहे. तरुणीच्या तक्रारीवरून, तसेच व्हिडीओच्या मदतीने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- जय जीत सिंह, अपर पोलीस महासंचालक, रेल्वे पोलीस