तारापूरचे बंद केलेले ३ मोठे उद्योग पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 02:48 AM2016-11-02T02:48:51+5:302016-11-02T02:48:51+5:30
अटी व बंधने पायदळी तुडवून प्रदूषण केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या तीन बड्या कारखान्यांकडून बँक गॅरंटी घेऊन ते पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांत नाराजी पसरली
पंकज राऊत,
बोईसर- पर्यावरणासंदर्भातील नियम, अटी व बंधने पायदळी तुडवून प्रदूषण केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या तीन बड्या कारखान्यांकडून बँक गॅरंटी घेऊन ते पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. या कारखान्यांचा वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात आला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तीन मोठे कारखाने आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करून त्या कारखान्यांचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला होता मात्र अवघ्या काही दिवसातच पर्यावरणासंदर्भात अटी व बँक गॅरंटी घेऊन कारवाई मागे घेण्यांत आली असून तीन कारखान्यांचा पाणी पुरवठा तर दोघांचा वीज पुरवठाही पूर्ववत सुरू करण्यात आला आहे तर ही कारवाई म्हणजे दिखाऊ व एक फार्स असल्याचा आरोप भुमिपूत्रांनी केला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील बॉम्बे रेयॉन, मुद्रा लाईफ स्टाईल व रेसोनन्स या तीन नामांकित उद्योगावर बंदची कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी देवून उद्योगांचा पाणी व वीज पुरवठाही खंडित करण्याचे पत्रही एमआयडीसी व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले होते मात्र या दोन्ही विभागाकडून पाणी व वीज पुरवठा खंडीत करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.
विशेष गंभिर बाब म्हणजे एका बाजुला म.प्र.नि. मंडळ पाणी पूरवठा खंडीत करण्याचे पत्र एमआयडीसीच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता नंदकुमार करवा यांना पाठविल्यानंतर म.प्र.नि. मंडळाच्या तारापूर एक या विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी करवा यांना मोबाईलवर प्रादेशिक अधिकारी ठाणे यांनी सांगितल्या प्रमाणे बाँम्बे रेयॉन व रेसोनन्स या उद्योगांचा पणी पूरवठा खंडित करू नका असा संदेश पाठविला होता तर या संदर्भात शिवसेनेचे धोडी व संखे यांनी संबधित अधिकाऱ्यांना कारवाई संदर्भात जाब विचारून कारवाईची मागणी केली होती.
अखेर २४ आॅक्टोबरला तिन्ही उद्योगांचा पाणी तर २५ आॅक्टोबरला वीज पुरवठा खंडित केला. दोन्ही कारवाईसाठी एमआयडीसी च्या पाणी पुरवठा विभागाच्या आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवलंबिले होते.
मात्र २७ आॅक्टोबर बाँम्बे रेयॉनला पुन्हा उद्योग सुरू करण्याचे पत्र म.प्र.नि. मंडळाने दिल्यानंतर २८ आॅक्टोबरला सकाळी त्वरीत पाणी पुरवठा सुरू करण्यांत आला.
मुद्रा लाईफ स्टाईल व रेसोनन्सचा पाणीपुरवठा म.प्र.नि. कडून पत्र मिळाले त्याच दिवशी म्हणजे २८ आॅक्टोबरला पाणी पुरवठा सुरू करण्याची तत्परता पाणी पुरवठा विभागाने दाखविली. तर रेसोनन्स व मुद्रा लाईफ स्टाईल वीज पुरवठा तत्परतेने सुरू करण्यात आला मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे बाँम्बे रेयॉन रीकनेक्शन चार्जेस भरू न शकल्याने तिचा वीज पुरवठा सुरू झाला नसला तरी तोही लवकरच सुरू होईल.
>स्थानिक म्हणतात कारवाईचा केला फार्स
हे तीन मोठे कारखाने आॅक्टोबरच्या शेवटास प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करून त्यांंचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला होता मात्र अवघ्या काही दिवसातच पर्यावरण संवर्धनाच्या अटी लादून बँक गॅरंटी घेण्यात आली
त्याबदल्यात कारवाई मागे घेण्यांत आली असून तिघांचा पाणी पुरवठा तर दोघांचा वीज पुरवठाही सुरू करण्यात आला आहे तर ही कारवाई म्हणजे दिखाऊ व एक फार्स असल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे.