उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा; शिंदे गटानं झळकावले बॅनर्स, ठाकरेंना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 12:28 PM2022-10-31T12:28:41+5:302022-10-31T12:29:05+5:30
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे केलेले नुकसान असं शिंदे गटाने म्हटलं आहे.
मुंबई - वेदांता, टाटा एयरबससारखे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गुजरातला गेल्याप्रकरणी विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या युवासेनेने शिंदे सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन केले. राज्यातील ३ मोठे उद्योग राज्याबाहेर का गेले याची खरी कारणं लोकांसमोर आणावीत. उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केली होती. आता ठाकरेंच्या युवासेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी बाळासाहेबांची युवासेना पुढे सरसावली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात युवासेनेने ठिकठिकाणी बॅनर्स झळकावत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
बाळासाहेबांची युवासेनेने पुणे, डोंबिवली यासह अनेक शहरात बॅनर्स लावले आहेत. त्यात उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा असा खोचक टोला लगावत राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्याला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. या बॅनरवर लिहिलंय की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे केलेले नुकसान. त्यात प्रकल्प, प्रस्तावित गुंतवणूक, रोजगार, प्रकल्प राज्याबाहेर कधी व कुठे गेला आणि महाविकास आघाडीची भूमिका असं तक्ता देत मांडले आहे.
वेदांता फॉक्सकॉन - १.५४ लाख कोटी, रोजगार -१.५ लाख, सप्टेंबर २०२० मध्ये गुजरातला गेला. या प्रकल्पाला विरोध करत प्रकल्प होणार नाही अशी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाईंची जानेवारी २०२० मध्ये घोषणा होती.
बल्क ड्रग पार्क - २७५० कोटी गुंतवणूक, ८० हजार रोजगार, हा प्रकल्प ऑक्टोबर २०२० मध्ये हिमाचल प्रदेशला गेला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी यासाठी कोणताही प्रस्ताव पाठवला नव्हता.
टाटा एअर बस - २१,९३५ कोटी, ६ हजार रोजगार हा प्रकल्प सप्टेंबर २०२१ रोजी गुजरातला गेला, या प्रकल्पासाठीही उद्धव ठाकरेंनी कोणताही प्रस्ताव पाठवला नव्हता.
अशा आशयाचे पोस्टर लावत एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे. तर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने हे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. मात्र सत्ताधारी-विरोधक यांच्या राजकीय युद्धात राज्यातील तरुणांचा रोजगार बुडल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"