टीएमटीमध्ये टीसीच होत आहेत टार्गेट
By admin | Published: August 23, 2016 03:54 AM2016-08-23T03:54:15+5:302016-08-23T03:54:15+5:30
एकीकडे टीएमटीच्या प्रवाशांना अजूनही पुरेशा बस नाहीत.
जितेंद्र कालेकर,
ठाणे- एकीकडे टीएमटीच्या प्रवाशांना अजूनही पुरेशा बस नाहीत. अनेक बस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच तिकीट तपासनिसांना विनातिकीट जाणाऱ्या दररोज १० प्रवाशांना पकडण्याचे टार्गेट दिले आहे. बेस्ट उपक्रमातही टीसींना अशा प्रकारचे ‘टार्गेट’ दिलेले नसताना टीएमटीकडून मात्र टीसींना ‘लक्ष्य’ केल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.
टीएमटीतील सर्व सहायक वाहतूक निरीक्षकांना रोज किमान १० विनातिकीट प्रवाशांना पकडण्याचे फर्मान काढले आहे. तसेच त्यांनी किमान पाच वाहकांच्या बॅगा तपासणी करून हिशेब पडताळणी करावी, पाच जणांच्या रकमेची तपासणी करावी, बसमधील मेमोप्रमाणे प्रवासी तिकिटे तपासणीची २४ उद्दिष्टे दिली आहेत. मुळात, पूर्वीच्या प्रमाणात आता कोणीही विनातिकीट जाण्यास धजावत नाही. हे अधिकाऱ्यांच्या तपासणीतही उघड झाले होते. वेळेअभावी रक्कम तपासणीही होत नाही.
एका वाहकाची बॅग तपासणीसाठी किमान अर्धा तास लागतो. अपुऱ्या बसमुळे जास्त वेळ थांबवणे शक्य होत नाही. त्यामुळे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या जवळपास सर्वच सहायक वाहतूक निरीक्षकांना परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. क्षुल्लक कारणावरून कारणे दाखवा नोटीस देणे, वेतनवाढ रोखणे, या कारणांमुळे टीसी हैराण झाले असून ते तणावग्रस्त असल्याची भावना अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
।बेस्टच्या सेवेतील तिकीट तपासनिसांना विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करणे सक्तीचे आहे. मात्र, प्रत्येक दिवशी किंवा महिन्याला मासिक दंड किती वसूल करावा, असा नियम प्रशासनाने केला नाही. तसेच त्यांना ठरावीक दंडवसुलीही दिलेली नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. शिवाय, दिवसाला किती प्रवाशांकडून दंड वसूल करावा, याचेही उद्दिष्ट नाही. मग, टीएमटीमध्येच तिकीट तपासनिसांकरिता हा दुजाभाव कशासाठी? मुळात सहायक वाहतूक निरीक्षकांना तिकीट तपासणीसह बस वेळेत सोडणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, अपघात झाल्यानंतर प्रवाशांना रुग्णालयात नेणे, पोलीस प्रक्रियेचा पाठपुरावा करणे, अशा ४० ते ४५ वेगवेगळ्या कामांचा समावेश असतो. तरीही, ठरावीक दंडवसुलीची सक्ती केल्याने टीएमटीच्या या टीसींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.