बरं झालं युती तुटली, तरुण भारतमधून शिवसेनेवर टीकास्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:25 PM2019-11-20T12:25:06+5:302019-11-20T12:42:25+5:30
हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे एकमेकांचे मित्र बनलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील युती मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर तुटली आहे.
मुंबई - हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे एकमेकांचे मित्र बनलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील युती मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर तुटली आहे. दरम्यान, भाजपा आणि शिवसेनेमधील तीस वर्षे जुनी युती तुटल्यानंतर संघाशी संबंधित असलेल्या तरुण भारत या वृत्तपत्रामधून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तीन दशकांपर्यंत चाललेली भाजपा आणि शिवसेनेमधील युती शिवसेनेच्या सत्तेसाठी हपापलेपणामुळे तुटल्याचा आरोप तरुण भारतमधून करण्यात आला आहे. तसेच बरं झालं युती तुटली, ही आता ही केवळ राजकीय भावनानाही तर जनभावनाही झालेली आहे, असा टोलाही शिवसेनेला लगावण्या आला आहे.
विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला होता. मात्र दोन्ही पक्षांनी आपापल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतल्याने अखेरीत मतभेदांचे पर्यावसान युती तुटण्यामध्ये झाले होते. दरम्यान, मंगळवारी प्रकाशित झालेल्या तरुण भारतच्या संपादकीय लेखातून युती तुटण्याचे खापर शिवसेनेवर फो़डण्यात आले आहे. बरं झालं युती तुटली, ही केवळ राजकीय भावनानाही तर जनभावनाही झालेली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर जवळपास तीन दशक चाललेली भाजपा आणि शिवसेना युती शिवसेनेच्या सत्तेसाठी हपापलेल्या भूमिकेमुळे अखेर तुटली आहे. असुसंस्कृत आणि अविवेकी मित्रापेक्षा सभ्य विरोधक परवडले, या न्यायाने युती तुटल्यावर भाजपा कार्यकर्तेच नाही तर सामान्य जनतेही हीच भावना आहे, असा टोला या लेखातून शिवसेनेला लगावण्यात आला आहे.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात शिवसैनिकांनी केलेल्या शेरेबाजीमुळे बरेच झाले वेगळे झालो, या भावनेवर शिक्कामोर्तबच झाले आहे, असेही या लेखात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युतीत शिवसेनेची अवस्था भांडखोर जोडीदारासारखी झाली आहे. शिवसेनेने भाजपासोबतची युती आपल्या आततायी भूमिकेमुळे तोडली आहे. शिवसेना हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागली आहे. यात भाजपाचे तात्कालिक नुकसान दिसत असले तरी दीर्घकालिन फायदा आहे. शिवसेनेचा मात्र, दीर्घकालिन नुकसान आहे, असा टोलाही शिवसेनेलेला लगावण्यात आल आहे.
शिवसेनेने आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यामुळे त्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यात तो दंग आहे. भाजपासारखा मित्रपक्ष गमावून आपण केवढी मोठी चूक केली, हे जेव्हा शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजेल, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, आपल्या या चुकीची किंमत शिवसेनेला आयुष्यभर मोजावी लागेल, असा इशाराही या लेखातून शिवसेनेला देण्यात आला.