पोहण्यासाठी कासवाला प्लास्टिकचे पाय
By Admin | Published: February 3, 2017 11:09 PM2017-02-03T23:09:45+5:302017-02-03T23:10:02+5:30
डहाणूतील कासव पुनर्वसन व संवर्धन केंद्रात दोन्ही पाय गमावलेल्या कासवाला प्लास्टिकचे पाय बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला
अनिरुद्ध पाटील/ऑनलाइन लोकमत
पालघर/डहाणू दि. 3 - डहाणूतील कासव पुनर्वसन व संवर्धन केंद्रात दोन्ही पाय गमावलेल्या कासवाला प्लास्टिकचे पाय बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. डॉ. दिनेश विन्हेलकर यांनी ही किमया साधली आहे. या प्रयोगामुळे आगामी काळात ही उपचार पद्धती विकसित होऊन प्राण्यांवर कृत्रिम अवयव बसवले जाऊ शकतात. त्या दृष्टीने अवयव गमावलेल्या प्राण्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.
डहाणू वनविभागाच्या पारनाका येथील उप वनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात कासव पुनर्वसन व संवर्धन केंद्राची उभारणी सहा वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. राज्यातील हे पहिले केंद्र आहे. वन विभाग आणि वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन अँड अॅनिमल वेल्फेयर असोसिएशन या प्राणीमित्र संघटनेद्वारे केंद्राचे कामकाज पाहिले जाते. पालघर जिल्ह्यातील विविध भागातून जखमी अवस्थेत सापडलेल्या प्राण्यांवर मुंबईतील पशुवैद्य डॉ. दिनेश विन्हेलकर येथे उपचार करतात.
गेल्या अनेक वर्षांपासून ते अविरत सेवा देत आहेत. डहाणू समुद्रकिनारी जखमी अवस्थेत सापडणार्या समुद्री कासवांचे प्रमाण प्रतिवर्षी किमान 35 ते 40 आहे. पुढील दोन्ही पाय गमावलेले कासव या पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अनेक दिवस उपचार केल्यानंतर प्रकृती स्थिरावली होती. दरम्यान त्या कासवाला कृत्रिम पाय लावण्याचा प्रयोग करण्याचे ठरवले. मात्र डाव्या पायाचा सांधा पूर्णतः निकामी झाल्याने प्लास्टिक पाया जोडणे अशक्य होते. तथापि उजव्या बाजूचा पर्याय वापरण्यात आला. त्यानुसार पायाच्या आकारमानाप्रमाणे प्लास्टिक पाय बसवण्यात आला. जो जोडता तसेच काढता येऊ शकतो. जयपूर फूटप्रमाणे त्याची रचना आणि कार्य आहे. प्लास्टिक पाय जोडल्यानंतर कासव पोहण्यासह दिशा बदलून मार्गक्रमण करण्यास यशस्वी ठरल्याचे निरीक्षण डॉ. दिनेश विन्हेलकर यांनी नोंदवले आहे. मात्र खोल समुद्रात त्याला सोडता येणे अशक्य असून, थोड्या वेळेसाठी हा प्लास्टिक पाय बसवणे शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रयोगामुळे अवयव गमावलेल्या प्राण्यांना कृत्रिम अवयव बसवल्यास थोड्या कालावधीसाठी एका जागेवरून हलणे शक्य होणार आहे.
"सदर प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अवयव गमावलेल्या अन्य प्राण्यांना त्याचा लाभ देता येईल. प्राथमिक अवस्थेतील हा टप्पा असून सुधारण्यास भरपूर वाव आहे. प्राणीमित्रांसाठी सुखावणारी बाब ठरली आहे."
- डॉ. दिनेश विल्हेनकर (प्रयोगशील पशुवैद्य)