तासगाव बाजार समिती राष्ट्रवादीकडे
By Admin | Published: August 3, 2015 12:50 AM2015-08-03T00:50:56+5:302015-08-03T01:41:23+5:30
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १९ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय मिळविला. भाजपा आणि काँग्रेसच्या
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १९ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय मिळविला. भाजपा आणि काँग्रेसच्या पॅनेलचा धुव्वा उडवला. भाजपाला व्यापारी गटात एका जागेवर विजय मिळाला. तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अस्तित्व, तर भाजपाची अस्मिता पणाला लागलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षच ‘बाहुबली’ ठरला.
बाजार समितीत २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन तुल्यबळ गट आमने-सामने आले होते. त्यामुळे मोठ्या चुरशीने ही निवडणूक लढविली गेली. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर झाले. शनिवारी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी केंद्रातही तणावाचे वातावरण होते. समितीच्या १९ जागांपैकी राष्ट्रवादीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. उर्वरित १८पैकी १७ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला.
विजयानंतर सर्व उमेदवारांसह कार्यकर्ते सूतगिरणीच्या कार्यस्थळावर जमले. या ठिकाणी आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत सभा झाली. त्यानंतर सर्व विजयी उमेदवारांनी अंजनी येथे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)