तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अंदाज, तर्कवितर्कांना उधाण
By admin | Published: October 16, 2014 10:27 PM2014-10-16T22:27:42+5:302014-10-16T22:53:54+5:30
दोघांतच लढत : कार्यकर्त्यांमध्ये पैजा
अमित काळे -- तासगाव --अत्यंत चुरशीने झालेल्या व लक्षवेधी असणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. झालेल्या मतदानावरुन बुधवारी रात्रीपासूनच राजकीय कार्यकर्त्यांत आकडेमोड सुरू झाली आहे. वाढलेला मतदार, त्याचप्रमाणे झालेले अभूतपूर्व मतदान पाहता, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना जबरदस्त यश मिळाल्यानंतर थोड्याच कालावधीनंतर झालेली ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची तसेच लक्षवेधी ठरली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. रविवार, दि. १९ रोजी मतदान यंत्रातून दोन माजी मंत्र्यांबाबत मतदारांनी दिलेला कौल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता आहे.
मतदारसंघात दोन तालुक्यांचा समावेश असल्याने सध्या मतदानाची सुरु असणारी बेरीज, वजाबाकी तालुका पातळीवर होत आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (भाजप) यांच्यातील प्रमुख लक्षवेधी लढतीत कोण कसे मतदान घेणार, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.आर. आर. पाटील हे मूळ तासगाव तालुक्यातील, तर अजितराव घोरपडे हे कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेंडगे हेही शेंडगे घराण्यातील आहेत. एकूण झालेल्या मतदानात खास करुन धनगर समाजाच्या मतदानाबाबत विशेष चर्चा होत आहे. धनगर समाजाचे मतदान जास्त आहे.मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार झाला. गावोगावी नेत्यांचे होणारे दौरे, प्रचार सभा, पदयात्रांनी दोन्ही तालुके दणाणून गेले होते. शेवटपर्यंत चुरसही जाणवत होती. मतदानादिवशी सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान झाले. शहरी भागात दुपारी १२ पर्यंत सुमारे ५०-५५ टक्के मतदान झाले होते. मतदारांची उत्स्फूर्तता जाणवत होती. त्यामुळे एकूण मतदान ७७ टक्क्यापर्यंत जाऊ शकले.
प्रशासनाने मतदार जागृतीत घेतलेली भूमिका, माध्यमांमधून झालेल्या आवाहनामुळेच हे मतदान झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभाविकच निकालाबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. नगरपरिषद क्षेत्रासह मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय झालेल्या मतदानावरुन बेरीज, वजाबाकीची आकडेमोड व अंदाजित टक्केवारी सध्या चर्चेत आहे. गावा-गावात चौका-चौकांमध्ये सध्या हाच विषय चर्चिला जात असल्याचे चित्र आहे. सुरुवातीस लढत चौरंगी-पंचरंगी वाटत होती. परंतु मैदान दुरंगीच झाले. आर. आर. पाटील आणि अजितराव घोरपडे या दोघांच्याचबाबतीत ही आकडेमोड सुरू आहे. कार्यकर्त्यांत पैजा लागत आहेत. वृत्तवाहिन्यांवरचे सर्व्हे, सट्टाबाजार याकडेही लक्ष आहे.
मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार झाला. गावोगावी नेत्यांचे होणारे दौरे, प्रचार सभा, पदयात्रांनी दोन्ही तालुके दणाणून गेले होते. एकूण ७७ टक्के चुरशीने मतदान झाले. प्रशासनाची मतदार जागृतीची आग्रही भूमिका, तसेच विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या आवाहनामुळे टक्केवारी वाढली.