कुंभमेळ्याच्या आरोग्यासाठी ‘टास्क फोर्स’
By Admin | Published: March 8, 2015 02:04 AM2015-03-08T02:04:05+5:302015-03-08T02:04:05+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्यात रुग्णांची व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, रुग्णवाहिका आदींचे नियोजन व नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय शनिवारी येथे बैठकीत झाला.
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंत व कोट्यवधी भाविकांच्या आरोग्याची व्यवस्था पाहण्याबरोबरच वैद्यकीय अधिकारी, औषधांचा साठा, रुग्णांची व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, रुग्णवाहिका आदींचे नियोजन व नियंत्रण ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय शनिवारी येथे बैठकीत झाला.
मिरवणूक मार्गावरच प्राथमिक आरोग्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी मार्गावरील रहिवासी कुटुंबातील एका व्यक्तीला प्रशिक्षण देण्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात ‘टेंट आयसीयू’ची व्यवस्था करण्याचाही विचार पुढे आला.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत आरोग्य अधिकारी, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रमुखांची बैठक झाली. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी, सिंहस्थ कुंभमेळा ‘अॅप’वर रुग्णवाहिकांची माहिती देण्याची सूचना केली. मध्यवर्ती ठिकाणीही ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ अत्यावश्यक बाब म्हणून तैनात असायला हवी, असेही त्यांनी सुचविले. कुंभमेळ्याच्या काळात रुग्णवाहिका सेवेचे नियंत्रण कक्ष पुण्याऐवजी नाशिकमध्ये कार्यान्वित करण्यावरही चर्चा झाली. (प्रतिनिधी)