तांत्रिक समस्यांसाठी टास्क फोर्स
By admin | Published: January 12, 2015 03:27 AM2015-01-12T03:27:23+5:302015-01-12T03:27:23+5:30
रेल्वेवर वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींतून मार्ग शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
अनिकेत घमंडी, डोंबिवली
रेल्वेवर वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींतून मार्ग शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व्याख्यानमालेच्या निमित्ताने ते शनिवारी ठाण्यात आले होते. त्या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार-आमदारांसोबत त्यांची बैठक झाली.
विस्तारित ठाणे स्थानक, सॅटिस २सह जिल्ह्यातील विविध रेल्वे प्रवाशांची गाऱ्हाणी रेल्वेमंत्र्यांनी ऐकली. ज्या कामांमध्ये तत्काळ गती देता येणे शक्य असेल ते निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान विस्तारित ठाणे स्थानक उभारण्यात कुठलीही तांत्रिक अडचण नसल्याचा निर्वाळा वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर प्रभू यांनी याबाबतचा व्यवहार्यता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. रेल्वेच्या गाड्या (रेक्स) जुन्या झाल्या असून, असंख्य गाड्या तातडीने मोडीत काढण्याची आवश्यकता आहे. मात्र, रेल्वेच्या सध्याच्या योजनेनुसार पुढील दोन वर्षे एकही नवी गाडी रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार नसल्याकडेही लोकप्रतिनिधींनी प्रभू यांचे लक्ष वेधले. ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडे सॅटिस २ हा प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही करण्यात येणार आहे. सॅटिस १ आणि सॅटिस २ पुलाद्वारे जोडण्यास मान्यता देण्यात आली आहे.
बैठकीला खासदार राजन विचारे, कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, संजय केळकर, डॉ. बालाजी किणीकर, महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, सभागृहनेते नरेश म्हस्के, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सूद, पश्चिम रेल्वेच हेमंतकुमार, एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी.पी. तायल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम, कोकण रेल्वे सचिव आशा सन्याल आदी उपस्थित होते.