तब्बल ११०० कोटींची कामे ४० मिनिटांत मंजूर
By admin | Published: December 22, 2016 04:42 AM2016-12-22T04:42:48+5:302016-12-22T04:42:48+5:30
महापालिकेच्या आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम दोन आठवडे उरले असल्याने मतदारांना खूष करण्यासाठी
मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम दोन आठवडे उरले असल्याने मतदारांना खूष करण्यासाठी विकास कामांचा बार उडवून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. शाळेच्या बांधकामापासून ते पूल उभारणी, विद्यार्थ्यांच्या गणवेशापर्यंतचे तब्बल १ हजार १०० कोटी रुपयांच्या कामांचे ७४ प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत अवघ्या ४० मिनिटांमध्ये शिवसेना-भाजपा युतीने मंजूर केले.
महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे. गेली २१ वर्षे महापालिकेत सत्तेवर असलेली शिवसेना-भाजप युती या निवडणुकीत फिस्कटण्याची व दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उभय पक्षांमध्ये प्रकल्पांचे श्रेय घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच प्रभाग फेररचना आणि आरक्षणाने सर्वच राजकीय पक्षांची मोठी अडचण केली आहे. २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीपैकी केवळ २० ते २५ टक्के निधीच खर्च झाला आहे. रस्ते, नालेसफाई घोटाळ्यामुळे विकासकामांचा निधी पडून आहे. (प्रतिनिधी)
आचारसंहितेपूर्वी कचरापेट्या वॉर्डात
कचरापेटी घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असताना अद्याप काही विभागांमध्ये कचरापेट्या पोहचलेल्या नाहीत. परिणामी नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. त्यावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कचरापेटी पाठवण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले.
घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिवाजी नगर, उड्डाणपूल, भुयारी मार्ग व तीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. ५७६ कोटींच्या हा प्रकल्प पूर्ण होण्यास अडीच वर्षे लागणार आहेत.
अंधेरी, मालाड, भांडुप, घाटकोपर, अंधेरी पश्चिम, दहिसर, कुर्ला, गोवंडी आणि मुलुंड विभागातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी ५० कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.