अभिमानास्पद! रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले उद्योगरत्न; राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 07:30 PM2023-07-27T19:30:16+5:302023-07-27T19:31:01+5:30
Ratan Tata Maharashtra Udyog Ratna Award: महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने उद्योगरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.
Ratan Tata Maharashtra Udyog Ratna Award: दिग्गज उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती मिळत आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचा पहिला मानाचा पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात येणार आहे.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र भूषण दर्जाचा हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. उद्योगरत्न पुरस्कार यंदापासून देण्यात येणार आहे. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना देण्यात येईल. याशिवाय महिला तसेच मराठी उदयोजक व अन्य एका उद्योजकाला असे तीन पुरसकार देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
देशाला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा
महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रामध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना प्रदान करण्यत येतो. याच धर्तीवर यावर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. टाटा ग्रुप भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. देशाला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे. तसेच टाटा समूहाची मोठी भरभराट रतन टाटा यांनी आपल्या कारकिर्दीत करून दाखवली. आजही रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठीही प्रसिद्ध आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र हे परदेशी गुंतवणुकीत देशात पहिल्या स्थानावरच आहे. मधल्या काळाचा उल्लेख करणार नाही, परंतु स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या सर्व्हेक्षणात राज्य पहिल्या स्थानावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात मंत्रिमंडळ उपसमितीच्या गेल्या तीन बैठकांमध्ये १.१८ लाख कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.