TATA मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक; नितीन गडकरींच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 05:36 PM2022-11-01T17:36:14+5:302022-11-01T17:36:58+5:30
नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती.
मुंबई - राज्यातील वेदांता, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प इतर राज्यात गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. त्यात टाटा समुह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे अशा आशयाचं पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र पाठवून सांगितले आहे. त्यामुळे कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ७ ऑक्टोबरला गडकरींनी टाटा समुहाला पत्र लिहिलं होते. त्यावर हे उत्तर देण्यात आले आहे.
टाटा समुहानं नितीन गडकरींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (VED) कौन्सिलच्या सदस्यांसोबत संपर्कात राहून नवीन गुंतवणुकीबाबत योग्य ते मूल्यांकन करेल. त्याचसोबत तुम्हालासुद्धा भेटण्याची इच्छा असल्याचं टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. १९ ऑक्टोबरला हे पत्र गडकरींना लिहिण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे टाटाचा एअरबस प्रकल्प नागपुरात आणण्यास उत्सुक होते. फडणवीस यांनी मागच्या महिन्यातच याबाबत दिल्लीत चर्चाही केली होती. नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती. मात्र हा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेला.
गडकरींच्या पत्रात म्हटलं होतं की, सेझ आणि बिगर एसईझेड क्षेत्रांचा समावेश असलेली ३००० एकर जमीन आहे. टाटा समूहाच्या कंपन्या नागपूरात गुंतवणूक करू शकतात. सहा राज्यांतील ३५० जिल्ह्यांशी रात्रभर कनेक्टिव्हिटी, जमिनीचे कमी दर, मनुष्यबळाची उपलब्धता आणि गोदाम सुविधा. एअर इंडिया, विस्तारा आणि एअर एशिया नागपूरला ऑपरेशन्स आणि रात्रीच्या पार्किंगसाठी हब बनवून खर्च कमी करू शकतात. मिहानमध्ये एअर इंडियाचे आधीच एमआरओ असल्याने टाटा समूहाची दूरदृष्टी लक्षात घेता, येथे आणखी एमआरओचे नियोजन केले जाऊ शकते असं गडकरींनी सांगितले होते. तर मिहानमध्ये संरक्षण उपकरणाच्या काही कंपन्या आहेत. टाटाचे प्रकल्प नागपुरात आले तर त्याला प्रोत्साहन दिले जाईल. टाटाची टीम नागपूरात आली तर आम्ही त्यांना पाहणीसाठी मदत करू अशी माहिती वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"