...अन्यथा मुख्यमंत्र्यांना दालनात कोंडू; तृप्ती देसाईंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:03 PM2020-02-19T12:03:13+5:302020-02-19T12:04:52+5:30
गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली आहे.
मुंबई : गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे कीर्तनातून भाष्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली आहे. तसेच इंदोरीकर महाराजांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा सुद्धा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्यात की, इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. इंदोरीकर हे आपल्या अनेक कीर्तनांमधून महिलांचा अपमान करतात. त्यामुळे असा अपमान सहन केला जाणार नसल्याचं त्या म्हणाल्या.
इंदोरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. तशी मागणी पोलिसांकडे केली असून, त्यांनी सकारात्मक आश्वासन आम्हाला दिले आहे. मात्र तरीही गुन्हा दाखल झाला नाही तर, उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला आहे.