Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे ४६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 08:35 AM2021-05-19T08:35:49+5:302021-05-19T08:36:03+5:30

३४ लाख ग्राहकांचा पुरवठा सुरळीत, १० हजार ७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान 

Tauktae Cyclone: 46 lakh consumers cut off due to cyclone; Most hit Thane district | Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे ४६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे ४६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

googlenewsNext

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे राज्यातील ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यांतील १० हजार ७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले. ६ हजार ४० गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला. ७ लाख ८५ हजार ५१९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला. यामुळे ७ लाख ७३ हजार ७६० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. पालघर जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास २ लाख ४४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

सी-लिंकवरील वाहतूक सुरू
अरबी समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे सुरक्षेच्या कारणात्सव वांद्रे - वरळी सी लिंकवरील वाहतूक तीनएक दिवस बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता वादळाचा आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतर मंगळवारी दुपारी सी लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मोनो रेल सुरू
मुंबईत चक्रीवादळामुळे वेगाने वारे वाहात होते. परिणामी चेंबूर - वडाळा - संत गाडगे महाराज चौकदरम्यान धावणारी मोनोरेल सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, मंगळवारी पावसाचा आणि चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर मोनोरेल सुरू करण्यात आली, असे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही नेटवर्कची प्रतीक्षा
तौक्ते चक्रीवादळाचा फटका दूरसंचार क्षेत्रालाही बसला. खासगी कंपन्यांनी तत्काळ आपली सेवा पूर्ववत केली असली, तरी सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएल आणि बीएसएनलचे ग्राहक मात्र दुसऱ्या दिवशीही नेटवर्कच्या प्रतीक्षेत होते. सोमवारी पश्चिम उपनगरातील बहुतांश भागांत एमटीएनएलची सेवा विस्कळीत झाली. लँडलाईनबरोबरच मोबाइललाही नेटवर्क नसल्याने ग्राहक हतबल झाले. मंगळवारी सायंकाळपर्यंत स्थिती कायम होती. दरम्यान, यासंदर्भात एमटीएनएलच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरळीत
तौक्ते चक्रीवादळाचा जोर ओसरताच सोमवारी रात्री १० नंतर मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मंगळवारी गुजरात वगळता अन्य विमानसेवा सुरळीत सुरू होत्या.सोमवारी चक्रीवादळ मुंबईच्या जवळ पोहोचल्यानंतर सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबई विमानतळ तब्बल ११ तास बंद ठेवावे लागले. वादळाची तीव्रता इतकी होती की, सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेली सात विमाने इतरत्र वळवावी लागली, तर ५६ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. रात्री १० नंतर विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली.रात्री विमानतळ सुरू झाल्यानंतर ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने पहिले लँडिंग केले, तर एअर इंडियाच्या विमानाला पहिल्या उड्डाणाचा मान देण्यात आला. १८ मे रोजी मुंबई विमानतळावरील उड्डाणे वेळापत्रकानुसार सुरू होती, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, वादळ गुजरातच्या दिशेने सरकल्यामुळे खबरदारी म्हणून राजकोट, अहमदाबाद आणि बडोदा विमानतळ बंद ठेवण्यात आले.

पालघर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे सुरू
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाबरोबरच डहाणू, वाडा, विक्रमगड, तलासरी आदी ग्रामीण भागालाही मोठा भटका बसला आहे. ग्रामीण भागात उन्हाळी भातशेतीबरोबरच आंबा, चिकू, जांभूळ बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेकडो घरांवरील पत्रे वादळात उडून गेले असून अनेकांच्या घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने सुरू आहेत. मात्र, किती नुकसान झाले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Tauktae Cyclone: 46 lakh consumers cut off due to cyclone; Most hit Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.