Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली, मदत कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 09:11 AM2021-05-22T09:11:05+5:302021-05-22T09:11:19+5:30
सिंधुदुर्गात ७० कोटी रुपयांचे नुकसान, सर्वत्र पंचनाम्याचे काम जोरात सुरू
मनोज वारंग
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग : तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकणाला बसला आहे. त्यातही सिंधुदुर्ग आणि त्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली असून पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पाहणी दौरा करून मदतीपासून कुणीही वंचित राहणार नसल्याचे आश्वासन दिले असले तरी ‘निसर्ग’चा अनुभव पाहता मदत नेमकी कधी हातात पडणार याची धाकधूक नुकसानग्रस्तांना असल्याचे चित्र दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचनामे करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून ७० कोटींचे नुकसान झाले आहे. ६,६५२ घरे, ३३६ गोठे, ८७ शाळा, ४६ इमारती बाधित झाल्या आहेत तर ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १७२ गावांतील १,०५९ शेतकऱ्यांचे ३३७५.१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. परंतु प्रशासनाच्या अहवालानुसार ११ कोटी ९१ लाख ९८ हजार ४३० एवढे नुकसान झाले आहे. सर्व पंचनामे होण्यासाठी आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता आहे.
पालघरमध्ये १ लाख ३० हजार नागरिकांना झळ
जिल्ह्यातील ९०९ गावांतील एक लाख ३० हजार नागरिकांना झळ लागली आहे. वादळात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. ५,२१७ घरांची पडझड झाली आहे. तर ७५ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २,२६४.२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती आणि आंबा, काजू, केळी आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. ७२२ वृक्ष उन्मळून पडले असून, मच्छीमारांच्या १९ बोटी फुटल्या आहेत. ९०९ गावांतील १०९२ विद्युत पोल पडल्याने चार-पाच दिवस या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला हाेता. सध्या पालघर विद्युत विभागाने त्यातील ८०० गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला असून, १०९ गावांतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत
जून २०२० मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील २९९ शेतकऱ्यांचे सुमारे ५ कोटी रुपयांवर नुकसान झाले होते. मात्र, आतापर्यंत केवळ २ कोटींपर्यंतच नुकसानभरपाई देण्यात आली आहे. निसर्ग वादळानंतर सलग दुसऱ्या वर्षी रायगड जिल्ह्यात १३ घरांचे पूर्णतः तर ११ हजार १४४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. १५० मासेमारी बाेटींसह १२५ मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे.