'पॅकेज'वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 11:26 AM2021-05-21T11:26:20+5:302021-05-21T11:55:05+5:30
CM Uddhav Thackeray in Ratnagiri: तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर; रत्नागिरीत प्रशासनासोबत आढावा बैठक
रत्नागिरी: विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांसाठी पॅकेजची घोषणा कधीपर्यंत करणार, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर 'पॅकेज'वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. रत्नागिरीत आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला
केंद्राच्या निकषप्रमाणे मदत लगेचच सुरू करू. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष बदलण्यावर अद्याप तरी काही निर्णय झालेला नाही. आतापर्यंत ९० ते ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. कोणत्या निकषांनुसार मदत करायची याचा निर्णय आढाव्यानंतर घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माझा दौरा चार तासांचा आहे. फोटोसेशन करण्यात मला रस नाही. त्याची गरज मला वाटत नाही. कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचले
पॅकेजवर माझा विश्वास नाही. पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही. सरकार वादळग्रस्त भागातील जनतेसोबत आहे. विरोधकांना उत्तर द्यायला मी इथे आलो नाही. कोकणातील जनतेला दिलासा देण्यासाठी आलो आहे. हेलिकॉप्टरमधून पाहणी करून नाही गेलो. लोकांना भेटायला आलो आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील वादळग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी चिमटा काढला. इथल्या विरोधी पक्षसारखे बोलणार नाही. माझा पंतप्रधानांवर विश्वास आहे. ते लवकरच महाराष्ट्रासाठीदेखील मदत जाहीर करतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.