Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ रौद्र रूप घेणार; महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 07:18 AM2021-05-16T07:18:18+5:302021-05-16T07:20:48+5:30

तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून नैर्ऋत्य दिशेला ३०० किमी पेक्षा कमी अंतरावर आहे.

Tauktae Cyclone will take the form of thunderstorm; Warning to the coast of Maharashtra | Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ रौद्र रूप घेणार; महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ रौद्र रूप घेणार; महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देकिनारपट्टीला लागून असलेल्या गावांमध्ये धोका जास्त असून अनेक गावांमध्ये मोठ्या लाटांमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ तुकड्या दाखलमालवण, देवगड व वेंगुर्ला किनारपट्टी भागात लाटांचे पाणी किनाऱ्यावर घुसले आहे

नवी दिल्ली : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ घोंगावत आहे. चक्रीवादळाची केरळच्या दिशेने वाटचाल सुरू असून त्याच्या प्रभावामुळे केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीवरही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासांमध्ये या वादळाची तीव्रता आणखी वाढत आहे. त्यामुळे १४५ किमी प्रति तास एवढ्या वेगाने वादळी वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादळ केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ घोंगावत असून अजस्त्र लाटा समुद्र किनाऱ्यांवर तांडव करत आहेत. केरळमधील थिरुवनंतपुरमपासून कासरगोडपर्यंत शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबियांना घरे सोडून मदत शिबिरात जावे लागले आहे. झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब कोसळले आहेत. किनारपट्टीला लागून असलेल्या गावांमध्ये धोका जास्त असून अनेक गावांमध्ये मोठ्या लाटांमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.

गोव्यात  एनडीआरएफ तुकड्या दाखल
तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून नैर्ऋत्य दिशेला ३०० किमी पेक्षा कमी अंतरावर आहे. रविवारी ते गोव्यापासून साधारणपणे २८० किलोमीटर अंतरावरून ते उत्तरेकडे सरकरणार आहे. गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ तुकड्या दाखल झाल्या आहेत.

तापमानवाढीचा धोक्याचा इशारा
चक्रीवादळाचे अतिशय वेगाने तीव्र स्वरुपात रुपांतर होणे हे वातावरण बदल आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्याचा परिणाम आहे. हा धोक्याचा इशारा असल्याचे भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ रॉक्सी कोल यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर लाटांचे तडाखे
मालवण, देवगड व वेंगुर्ला किनारपट्टी भागात लाटांचे पाणी किनाऱ्यावर घुसले आहे. मालवण बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री साडेसात वाजता पाऊस थांबला होता. बंदर जेटी, दांडी, देवबाग, तारकर्ली, तळाशील किनारपट्टी भागात भरतीचे पाणी आत घुसले होते. वेंगुर्ला तालुक्यामध्ये काही ठिकाणी झाडे कोसळल्याने काही घरांचे नुकसान झाले. मांडवी खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रत्नागिरीत ढगांच्या गडगडाटात पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टीवरील तालुक्यांसह सर्वत्र दुपारपासून ढगांच्या गडगडाटात पाऊस पडत आहे. समुद्रात लाटांचे स्वरूप वाढले असले तरी अजून धोकादायक झालेले नाही. हे वादळ पहाटे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करील, असा अंदाज आहे.

मुंबईला आज बसणार तडाखा
हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई या जिल्ह्यांना तडाखा बसेल. मुंबईसह लगतच्या जिल्ह्यात वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई पालिकेसह सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश आहेत. वांद्रे-वरळी सी-लिंकही बंद ठेवला आहे.

तौक्ते चक्रीवादळ रात्री गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे अडीचशे किमी अंतरावर होते. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर पोरबंदर आणि नालिया या शहरांजवळ १८ मे रोजी धडकेल. तोपर्यंत ते आणखी तीव्र होण्याची भीती आहे. त्यावेळी ताशी १३० ते १४५ क‍िमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. चक्रीवादळाला तौक्ते हे नाव म्यानमार देशाने दिले आहे. सरड्याच्या एका विशिष्ठ प्रजातीवरून 
हे नाव देण्यात आले आहे. बोलका सरडा म्हणून या प्रजातीला ओळखले जाते.

Web Title: Tauktae Cyclone will take the form of thunderstorm; Warning to the coast of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.