तावडेंनी दहावीला डमी बसवला!
By admin | Published: July 10, 2015 03:12 AM2015-07-10T03:12:15+5:302015-07-10T03:12:15+5:30
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ
मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसविला होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला असून तावडेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणीही केली आहे.
पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले, बोगस पदवी असणाऱ्या शिक्षणमंत्र्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यासारखी महत्वाची खाती आहेत. त्यामुळे या शिक्षणमंत्र्याच्या बोगसगिरीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा होण्याची भीती वाटत आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठ हे १२ वी फेल विद्यार्थांना इंजिनिअरच्या पदव्याचे वाटप करणारे विद्यापीठ होते. या विद्यापीठातूनच तावडे यांनी बोगस पदवी घेतली असून ते बारावी नापास आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.
तावडेंचे बोगस पदवीचे प्रकरण उघड होऊन देखील ते आपल्या फेसबुक पेज तसेच संबधीत संकेतस्थळावरील माहितीत ज्ञानेश्वर विद्यापीठातून बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण झाल्याचे दाखवत आहेत. तावडेंनी जनतेची ही फसवणूक बंद करावी असे मलिक यांनी म्हटले आहे.