तावडेला वाटते पोलीस कोठडीची भीती
By admin | Published: September 11, 2016 04:02 AM2016-09-11T04:02:00+5:302016-09-11T04:02:00+5:30
माझ्या जीवितास धोका आहे, त्यामुळे मला स्वतंत्र खोलीत ठेवून चौकशी व्हावी व इतर सोयी द्याव्यात, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने त्याचे वकील समीर पटवर्धन यांच्याकडे केली आहे.
कोल्हापूर : माझ्या जीवितास धोका आहे, त्यामुळे मला स्वतंत्र खोलीत ठेवून चौकशी व्हावी व इतर सोयी द्याव्यात, अशी मागणी डॉ. वीरेंद्र तावडे याने त्याचे वकील समीर पटवर्धन यांच्याकडे केली आहे. तावडे हा राजारामपुरी पोलिस कोठडीत आहे. शनिवारी अॅड. पटवर्धन यांनी न्यायालयाच्या परवानगीनुसार तावडेची भेट घेतली, तेव्हा त्याने ही मागणी पटवर्धन यांच्याकडे केली.
पानसरे हत्या प्रकरणी तावडेला एसआयटीने अटक केली आहे. १६ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या कोठडीत शहरातील तीनही पोलीस ठाण्यांतील संशयित आरोपी आहेत.
दरम्यान, पनवेल येथून नार्कोटिक औषधांबाबत चौकशीस आणलेल्या दोघांकडे स्वतंत्र चौकशी होणार आहे. त्यानंतर या गुन्ह्यातील संशयितांची एकमेकांसमोर चौकशी होईल.
पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड याचीही पटवर्धन यांनी शनिवारी दुपारी कळंबा कारागृहात भेट घेतली. (प्रतिनिधी)