तावशी, भवानीनगरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश
By Admin | Published: June 27, 2016 12:52 AM2016-06-27T00:52:10+5:302016-06-27T00:52:10+5:30
तुम्ही अडचणीत आहात... तुमच्यावर करणी केली आहे... घरामध्ये भांडणे होत आहेत...
भवानीनगर : तुम्ही अडचणीत आहात... तुमच्यावर करणी केली आहे... घरामध्ये भांडणे होत आहेत... कोणतेही काम मार्गी लागत नाही.. काळजी करू नका..दोन मिनिटांत तुमच्या अडचणी दूर करू.. आम्हाला फक्त घर दाखवा, असे आवाहन करीत तावशी भागात भोंदूगिरी करण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांमुळे फसला.
रविवारी (दि. २६) सकाळी दुचाकीवर दोघे जण घरांची टेहाळणी करीत फिरत होते. तसेच, रस्त्याच्या कडेला थांबवून तेथील ग्रामस्थांना संपर्क साधत होते. तुमची न होणारी अवघड कामे चुटकीसरशी मार्गी लावू. तुमच्यावर करणी करणाऱ्यांची नावे नावानिशी
लगेच सांगू, असे आवाहन हे दोघे जण या वेळी करीत होते.
हा प्रकार येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. त्यांनी तातडीने
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे पुणे जिल्हा प्रधान सचिव भारत विठ्ठलदास यांच्याशी संपर्क साधला.
या वेळी विठ्ठलदास यांची त्या दोघांना ग्राहक म्हणून कार्यकर्त्यांनी मोबाईलवरच संपर्क साधून ओळख करून दिली. विठ्ठलदास यांचे दुकान चालत नाही. त्यांना तुमची गरज आहे, असे सांगून भोंदूगिरी करणाऱ्या दोघांना भवानीनगर (ता. इंदापूर) येथे पाठविण्यात आले. येथील भवानीमातेच्या मंदिराजवळ विठ्ठलदास दोघा भोंदुंना भेटले. या वेळी त्या दोघांनी तोच ‘डॉयलॉग’ पुन्हा विठ्ठलदास यांना सांगितला. तुमच्या दुकानाची अडचण कायमची मिटवितो. वास्तू दाखवा. तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय सगळं. आम्ही बंदोबस्त करतो, असेदेखील या वेळी दोघांनी विठ्ठलदास यांना सांगितले.
अशिक्षित माणसे बळी
याबाबत विठ्ठलदास यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, लोकांना फसविण्यासाठी करणी, भानामती या शब्दांचा वापर होतो.
ग्रामीण भागातील अनेक साधी माणसे या प्रकाराला बळी पडतात. अनेकांची फसवणूक होते.
सध्या कायद्याने या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकारची व्यक्ती
घरासमोर आल्यास त्याला घरात घेऊ नये.
नागरिकांनी दक्ष राहावे. फसवणुकीचे प्रकार आढळल्यास पोलीस, तसेच ‘अनिंस’शी संपर्क साधावा.