क्लृप्त्या लढवूनही करवसुली असमाधानकारकच!

By Admin | Published: April 4, 2017 04:28 AM2017-04-04T04:28:39+5:302017-04-04T04:28:39+5:30

केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवूनही महापालिकेकडून समाधानकारक वसुली झालेली नाही

The tax collection is also uncomfortable with the help of the captain! | क्लृप्त्या लढवूनही करवसुली असमाधानकारकच!

क्लृप्त्या लढवूनही करवसुली असमाधानकारकच!

googlenewsNext

कल्याण : जास्तीतजास्त करवसुली व्हावी, यासाठी केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवूनही महापालिकेकडून समाधानकारक वसुली झालेली नाही. उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट ५२२ कोटी रुपये इतके देण्यात आले होते. परंतु, महापालिकेकडून केवळ ३१४ कोटी १७ लाखांची वसुली झाली आहे. मागील वर्षापेक्षा यंदा केलेल्या वसुलीचा आकडा सर्वाधिक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, करवसुलीत ‘ब’ प्रभाग अव्वल ठरला असून त्यात ८९ कोटी ८५ हजार रुपयांची करवसुली झाली आहे.
१ एप्रिल ते ३१ मार्चदरम्यान केडीएमसीच्या महासभेने मालमत्ता, पाणीपट्टी आणि अन्य करवसुलीद्वारे ७७८ कोटी १८ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मालमत्ताकर ५२२ कोटी ९ लाख, पाणीबिलवसुलीचे ८६ कोटी ९ लाख, तर अन्य कराच्या माध्यमातून १२० कोटींचे लक्ष प्रशासनाला देण्यात आले होते. यात मालमत्ताकरापोटी ३१४ कोटी १७ लाख, पाणीबिलापोटी ५५ कोटी ५७ लाख, तर नगररचना विभागाने नगररचना फी शुल्कापोटी १०९ कोटी ६० लाख रुपये कराची वसुली केली आहे. करवसुलीची टक्केवारी पाहता संपूर्ण करवसुली ६१.४४ टक्के झाली आहे. यात मालमत्ताकर ५९. ९० टक्के, पाणीबिल ६४.८३ टक्के आणि विशेष अधिनियमातील वसुली ९१.३३ टक्के झाली आहे. मागील वर्षी मालमत्ताकरापोटी २६६ कोटी २६ लाख रुपये वसुली झाली होती. यंदा ती ३१४ कोटी १७ लाख झाल्याने ती समाधानकारक व चांगली झाली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
करवसुलीसाठी रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवल्या होत्या. यात थकबाकीदारांविरोधात कठोर केलेल्या कारवाईत मालमत्ता जप्त करणे, नळजोडण्या खंडित करणे, थकबाकीदारांच्या आवारात कचरा टाकणे, कचरा न उचलणे, त्यांच्या आवारात कचराकुंडी ठेवणे, अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. वर्षभरात मालमत्ताकरापोटी ३१४ कोटी १७ लाख वसूल केले असले, तरी ३१ मार्चला अखेरच्या दिवशी २१ कोटी २० लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. आयुक्तांनी करवसुलीत टाळाटाळ करणाऱ्या काही कर्मचारी आणि करअधीक्षकांवर निलंबन कारवाईचा बडगाही उगारला होता. याउपरही करवसुली समाधानकारक झालेली नसल्याचे वास्तव आहे.
करवसुलीत ‘ब’ प्रभाग अव्वल ठरला आहे. या प्रभागात मालमत्ताकरातून ८९ कोटी ८५ हजार ६६२ रुपयांची, तर पाणीबिलापोटी ८ कोटी ६० लाख १५ हजार ५५७ रुपयांची वसुली झाली आहे. त्याखालोखाल ‘क’ प्रभागाची वसुली झाली आहे. या प्रभागातून मालमत्ताकरापोटी ४१ कोटी आणि पाणीपट्टी पाच कोटी ७६ लाखांची वसुली झाली आहे. २७ गावांच्या ‘ई’ प्रभाग कार्यालयाने मालमत्ताकराचे १० कोटी ९१ लाख आणि पाणीपट्टीचे ७ कोटी ७२ लाख रुपये वसूल केले आहेत. (प्रतिनिधी)
>५०३ मालमत्ता जप्त
केडीएमसीने केलेल्या कारवाईअंतर्गत ५०३ मालमत्ता जप्त केल्या असून २१ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. आंबिवली येथील नेपच्यून बिल्डर्सचे कार्यालय सील केले होते. त्यानंतर, या विकासकाने २१ सदनिका महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत. मालमत्तेच्या थकबाकीपोटी ६ कोटी २० लाखांचा ३० जूनचा धनादेश महापालिकेकडे सुपूर्द केला आहे.

Web Title: The tax collection is also uncomfortable with the help of the captain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.