पायाभूत प्रकल्पांसाठी करमुक्त कर्जरोखे
By admin | Published: August 27, 2016 05:25 AM2016-08-27T05:25:16+5:302016-08-27T05:25:16+5:30
कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करमुक्त कर्जरोखे (टॅक्स फ्री बाँडस्) काढण्याची केंद्र सरकारने राज्य शासनाला परवानगी दिली
मुंबई : राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करमुक्त कर्जरोखे (टॅक्स फ्री बाँडस्) काढण्याची केंद्र सरकारने राज्य शासनाला परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विकास प्रकल्पांबाबत वृत्तपत्र संपादकांशी चर्चा करताना ही माहिती दिली.
या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आयकरात सवलत मिळणार आहे. हे शासनाचे कर्जरोखे असल्याने परताव्याची खात्री असेल. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या कर्जरोख्यांमध्ये व्याज हे आयकरमुक्त असते. यापूर्वीही सरकारने
काढलेल्या करमुक्त कर्जरोख्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.
(विशेष प्रतिनिधी)
>दोन लाख कोटींची गरज
नवी मुंबई विमानतळ, सागरी मार्ग, मेट्रो ३ आदींसह राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जवळपास दीड ते दोन लाख कोटी रुपयांची गरज भासणार आहे. केवळ करमुक्त कर्जरोखेच नव्हे तर अन्य मार्गांनी हा पैसा उभारण्याचे आटोकाट प्रयत्न सध्या राज्य शासन करीत आहे. त्यात परकीय बँका, वित्तीय संस्था, परदेशातील पेन्शन फंड आदींच्या माध्यमातून गुंतवणूक आणली जात आहे.