टॅक्सी चालकाचे अपहरण करून चाकूहल्ला
By admin | Published: April 24, 2017 03:48 AM2017-04-24T03:48:51+5:302017-04-24T03:48:51+5:30
प्रवासी बनून टॅक्सीत बसलेल्या तीन व्यक्तींनी टॅक्सी चालकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर चालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी
मुंबई : प्रवासी बनून टॅक्सीत बसलेल्या तीन व्यक्तींनी टॅक्सी चालकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर चालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी पूर्व द्रुतगती मार्गावर घडली. याबाबत सायन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मोहमद नसरुद्दीन कुरेशी (३५) असे या टॅक्सी चालकाचे नाव
असून तो गोवंडीच्या शिवाजीनगर येथील राहणारा आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कुरेशी आपली टॅक्सी घेऊन घराबाहेर पडला. ठाण्यापर्यंत एका प्रवाशाला सोडल्यानंतर तीन हात नाका
येथून ग्रॅण्ट रोडला जाण्यासाठी तीन प्रवासी त्याच्या टॅक्सीत बसले. पूर्व द्रुतगती मार्गावरून टॅक्सी विक्रोळी हायवेवर येताच आरोपींनी लघुशंकेचा बहाणा करत टॅक्सी थांबवली. याच दरम्यान या आरोपींनी चालकाला चाकूचा धाक दाखवत मागच्या सीटवर नेले, तर एका आरोपीने टॅक्सी सायनच्या दिशेने वळवली. टॅक्सीमध्ये दोन्ही आरोपींनी कुरेशी याला जबर मारहाण केली. त्यानंतर चाकूने त्याच्या हातावर, कानावर आणि पोटावर जबर वार केले. टॅक्सी चुन्नाभट्टी हायवेजवळ येताच आरोपी आणि टॅक्सी चालकामध्ये झटापट झाली. त्यामुळे टॅक्सी चालवत असलेल्या आरोपीचे टॅक्सीवरील नियंत्रण सुटले. टॅक्सी रस्त्यालगत असलेल्या दुभाजकावर धडकली. त्यामुळे घाबरलेल्या आरोपींनी टॅक्सी तेथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
काही पादचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ कुरेशी याला बाहेर काढले. सायन रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ही बाब सायन पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कुरेशीची भेट घेतली. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरून तीन अनोळखी व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)