जुहू चौपाटीवरील ‘त्या’ मृत व्हेलची होणार टॅक्सीडर्मी
By admin | Published: June 27, 2016 01:51 AM2016-06-27T01:51:55+5:302016-06-27T01:51:55+5:30
जुहू चौपाटी येथे जानेवारी महिन्यात किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळलेल्या ‘व्हेल’ माशाची लवकरच टॅक्सीडर्मी होणार आहे.
मुंबई : जुहू चौपाटी येथे जानेवारी महिन्यात किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळलेल्या ‘व्हेल’ माशाची लवकरच टॅक्सीडर्मी होणार आहे. या व्हेल माशाला जुहू येथेच पुरले. मात्र या ३५ फुटी व्हेल माशाचा सांगाडा जतन करण्याचा निर्णय खारफुटी वनविभागाने घेतला आहे.
परळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संतोष गायकवाड यांच्याकडे हे टॅक्सीडर्मी करण्याचे काम सोपविले आहे, अशी माहिती खारफुटी वनविभागाचे मुख्य संरक्षक वासुदेवन यांनी ‘लोकमत’ला दिली. ३५ फूट व्हेल माशाचा सांगाडा खारफुटी वनविभागाच्या बेलापूर येथील संग्रहालयात ठेवण्यात येईल.
हा व्हेल मासा ३५ फूट लांब असून, त्याची रुंदी ७ फूट आहे. एवढ्या मोठ्या माशाचा प्रथम सांगाडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे हे आव्हानात्मक काम असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
व्हेल माशाला कुजण्यासाठी साधारणत: एक वर्षाचा कालावधी लागेल. त्यानंतर व्हेलची हाडे बाहेर काढून ती स्वच्छ केली जातील. डीग्रेसिंग, ब्लेचिंग, माउटिंग, वेल्डिंग या पद्धतींचा वापर करण्यात येईल. (प्रतिनिधी)