घर ते आगार प्रवास करा टॅक्सीने
By admin | Published: May 18, 2015 04:17 AM2015-05-18T04:17:50+5:302015-05-18T04:17:50+5:30
अधिकाधिक प्रवाशांनी एसटीकडे आकर्षित व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक नव्या योजना आणि सुविधा आणल्या जात आहेत.
मुंबई : अधिकाधिक प्रवाशांनी एसटीकडे आकर्षित व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक नव्या योजना आणि सुविधा आणल्या जात आहेत. प्रवाशांसाठी एसटी महामंडळ आणखी एक नवी योजना आणण्याच्या विचारात आहे. आगारातून एसटी पकडणाऱ्या प्रवाशांचा त्यांच्या सामानासह घर ते आगार असा प्रवास सुकर होण्यासाठी खाजगी टॅक्सींचा पर्याय देण्याचा विचार करीत आहे.
एसटीचे भारमान हे सध्या ५८ टक्क्यांपर्यंत आहे. हे भारमान वाढावे यासाठी महामंडळाकडून अनेक नव्या युक्त्या योजिल्या जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यातील जुन्या एसी बसेस काढून त्याजागी नव्या स्कॅनिया आणि व्होल्वो कंपनीच्या बस विकत घेतल्या आहेत. सर्वात मोठ्या अशा या सेवेबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळ आणखी एक नवी योजना अमलात आणण्याचा विचार करीत आहे. अनेक प्रवासी घरातून आपल्या सामानासह निघून सुरुवातीपासून एसटी पकडण्यासाठी आगारापर्यंत प्रवास करतात. मात्र सामान घेऊन आगारापर्यंत प्रवास करताना प्रवाशांच्या चांगलेच नाकी नऊ येतात. हे पाहता प्रवाशांचा घर ते आगार प्रवास सुकर करण्यासाठी खाजगी टॅक्सी वाहतुकीचा पर्याय देण्यात येणार आहे. खाजगी टॅक्सीने आगारापर्यंत प्रवास करण्यासाठी प्रवाशाला टॅक्सी सेवेत सवलत देण्यात येईल आणि त्या खाजगी टॅक्सीच्या शुल्काचा एसटीच्या तिकिटांतच समावेश केला जाईल, असे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. अन्यथा एसटीच्या तिकिटांतच खाजगी टॅक्सीच्या शुल्काचा समावेश न करता ते कंपनीच्या चालकालाच स्वतंत्रपणे देण्याचाही विचार केला जाईल.