प्राण्यांसाठीही आता टॅक्सीसेवा
By admin | Published: April 26, 2017 11:48 PM2017-04-26T23:48:38+5:302017-04-26T23:48:38+5:30
प्राणिमित्र असलेल्या डोंबिवलीच्या तरुणीने प्राण्यांसाठी टॅक्सीसेवा सुरू केली आहे. या आगळ्यावेगळ्या टॅक्सीसेवेला प्राणिमित्रांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जान्हवी मोर्ये / डोंबिवली
प्राणिमित्र असलेल्या डोंबिवलीच्या तरुणीने प्राण्यांसाठी टॅक्सीसेवा सुरू केली आहे. या आगळ्यावेगळ्या टॅक्सीसेवेला प्राणिमित्रांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्राण्यांना रुग्णालयात नेणे, प्रवासाला नेणे अधिक सोयीचे झाले आहे.
कोपर रोड परिसरात लक्ष्मी अग्रवाल राहते. ती सीए झाली आहे. तिचा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. लक्ष्मी प्राणिमित्र असून तिच्या मित्रमैत्रिणींनी एक फेसबुक पेज तयार केले आहे. लक्ष्मीने पाहिले की, सरकारी वाहनांतून प्राण्यांना प्रवास करण्यास बंदी आहे. बस, रिक्षातून प्राण्यांना नेण्यास मज्जाव केला जातो. प्राणी इतरांना चावा घेतील, गाडीत घाण करतील, या भीतीपोटी प्राण्यांना प्रवास करून दिला जात नाही. पाळीव प्राणी आजारी पडले, तर त्यांना सार्वजनिक वाहनांतून रुग्णालयात नेता येत नाही. प्राण्यांचा मालक बाहेरगावी जाणार असल्यास त्या प्राण्याला बोर्डिंगमध्ये ठेवण्यासाठीही नेण्यास चालकांकडून नकार दिला जातो. ही समस्या लक्षात घेऊन लक्ष्मीने तिच्या टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा उपयोग केला. सुरुवातीला तिने दोन टॅक्सी प्राण्यांसाठी सुरू केल्या. एका प्राण्यासाठी दर किलोमीटरला २५ रुपये भाडे आकारले जाते. सहा महिन्यांपासून तिचा हा प्राणी टॅक्सीसेवा प्रयोग सुरू आहे. सगळ्याच प्राण्यांना या दोन टॅक्सींमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. २४ तास आधी प्रवासासाठी टॅक्सी बुकिंग करावे लागते. काही प्राण्यांना अलीकडेच लक्ष्मीने मुंबई, दिल्ली, वांद्रे, खार आणि पुणे येथवर प्रवास घडवून आणला आहे.