मद्यधुंद तरुणीने उडवली टॅक्सी
By admin | Published: June 10, 2015 03:33 AM2015-06-10T03:33:07+5:302015-06-10T03:33:07+5:30
दक्षिण मुंबईतल्या हॉटेलमध्ये पार्टी झोडून दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या जान्हवी गडकर या वकील तरुणीने इस्टर्न फ्री-वेवर वाशीनाका येथे स्वत:च्या आॅडी कारने एका टॅक्सीला समोरून जोरदार धडक दिली.
मुंबई : दक्षिण मुंबईतल्या हॉटेलमध्ये पार्टी झोडून दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या जान्हवी गडकर (३२) या वकील तरुणीने इस्टर्न फ्री-वेवर (पूर्व मुक्त मार्ग) वाशीनाका येथे स्वत:च्या आॅडी कारने एका टॅक्सीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला. धक्कादायक बाब म्हणजे जान्हवी इतकी नशेत होती, की चेंबूरला जाण्यासाठी ती आॅरेंज गेटकडे उतरणाऱ्या फ्री-वेच्या विरुद्ध मार्गिकेवर घुसली. या विरुद्ध मार्गिकेवरून सुमारे १० कि.मी. अंतर तिने वेगात कापले.
अपघात इतका भीषण होता, की मारुती ओमनी टॅक्सी अर्ध्यावर चेपली गेली. त्यामुळे टॅक्सीचालक आणि पुढल्या सीटवर बसलेला प्रवासी अशा दोघांचा जागेवरच मृत्यू झाला; तर मागे असलेल्या तीन महिला व तरुण गंभीर जखमी झाले. टॅक्सीचालक वगळता उर्वरित पाच प्रवासी एकाच कुटुंबातील होते. जखमींवर चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एअर बॅगमुळे ती वाचली
या भीषण अपघातात आरोपी जान्हवीच्या शरीरावर एकही ओरखडा उठलेला नाही. एअर बॅग्जमुळे ती वाचली.
मृत : हुसेन अब्दुल सय्यद (५७, टॅक्सीचालक), सलीम साबूवाला (५०). जखमी : सलीम यांच्या पत्नी हफिजा (४५), साबीया (२२), सलमा (१९), मुलगा नोमान (१७)