हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: March 17, 2017 01:54 PM2017-03-17T13:54:33+5:302017-03-17T13:54:33+5:30

खासगी टॅक्सीचालक राजेश ढामरे याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

Taxicaber's suicide attempt to ward off the demand of the taxi | हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

ऑनलाइन लोकमत/राजू काळे

भाईंदर, दि. 17 - खासगी टॅक्सीचालक राजेश ढामरे याने शुक्रवारी सकाळी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. भार्इंदर-पूर्वेकडील गोल्डन नेस्ट येथून अंधेरी मेट्रो स्थानकदरम्यान खासगी टॅक्सीतून प्रवासी वाहतूक करणा-या टॅक्सीचालकांकडे शिवसेनेच्या स्थानिक वाहतूक सेनेचा शहर संघटक गफ्फार पींडारे याने 50 हजारांचा वार्षिक हप्ता मागितल्याने त्रस्त झालेल्या राजेशने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी सकळी ८.१५ वाजता गोल्डन नेस्ट टॅक्सी स्टॅन्डवरच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला.  
 
घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थितांनी त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून गोल्डन नेस्ट येथे सुमारे १०० खासगी टॅक्सीचालक प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करीत आहेत. तसेच काळी-पिवळी टॅक्सी स्टॅन्डसुद्धा येथेच असला तरी प्रवासी, जलद सेवेसाठी खासगी टॅक्सींना पसंती देतात.
 
त्यामुळे गोल्डन नेस्ट ते अंधेरी येथील मेट्रो स्थानकापर्यंत खासगी टॅक्सीचालक प्रवासी वाहतूक करतात. प्रसंगी ज्यादा प्रवासीसुद्धा ते वाहुन नेतात. काही जणांचे उत्पन्न या व्यवसायावरच अवलंबून असल्याने या टॅक्सीचालकांना सेनेच्या वाहतूक सेनेचा आधार मिळाला. अलिकडेच मुंबईच्या वाहतूक विभागाने टॅक्सींच्या प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने सुरुवातीला ही कारवाई अंधेरी ते वांद्रे दरम्यान सुरु करण्यात आली आहे. त्यात येथील खासगी टॅक्सीचालकांवर कारवाई केली जात असल्याने त्यामागे गफ्फारच असल्याचा आरोप खासगी टॅक्सीचालकांकडून करण्यात येत आहे. 
 
पुढे ही कारवाई दहिसरपर्यंत सुरु होणार असल्याने कारवाई टाळण्यासाठी पैसे मोजावे लागतील, असा दावा करीत गफ्फारने येथील खासगी टॅक्सीचालकांकडे वार्षिक ५० हजार रुपये हप्ता मागण्यास सुरुवात केली. त्याला टॅक्सीचालकांनी नकार दिल्याने तो वाहतूक पोलिसांमार्फत टॅक्सीचालकांवर कारवाईचा सूड उगारु लागला. गेल्या काही दिवसांत किमान ३० ते ४० टॅक्सीचालकांवर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. गुरुवारी तर १५ टॅक्सीचालकांचे मेमो फाडण्यात आले. या रोजच्या कारवाईचा कंटाळा आला असतानाच गफ्फारच्या ५० हजार रुपयांच्या हप्ताखोरीचा तगादा टॅक्सीचालकांच्या मागे लागला होता. रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह चालत असल्याने राजेश ढामरे या खासगी टॅक्सीचालकाने शुक्रवारी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. त्या तयारीत तो गोल्डन नेस्ट स्टॅन्डवर आला.
 
त्याने स्वत:ला पेटवण्यासाठी सोबत डिझेलच्या डब्यातून आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले. आग लावण्यासाठी त्याने लायटर खिशातून काढताच त्याच्या सहका-यांनी वेळीच त्याला रोखल्याने पुढील दुर्घटना टळली. त्यावेळी राजेश हा गफ्फार याच्या त्रासामुळेच मी स्वत:ला पेटवुन घेत असल्याचे तो सांगत होता. त्याच्या न गफ्फारवर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत टॅक्सी न चालविण्याचा तसेच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान गफ्फार याने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
 
प्रतिक्रिया
'गफ्फार याने आमच्यावरील कारवाई टाळण्यासाठीच वार्षिक ५० हजारांचा हप्ता मागण्यास सुरुवात केली. तो देण्यास नकार दिल्याने त्याने कारवाईच्या माध्यमातून आम्हाला त्रास देणे सुरु केले आहे. - सैफ शेख , खासगी टॅक्सीचालक 
 
गोल्डन नेस्ट स्टॅन्डवर गेल्या अनेक वर्षांपासून टॅक्सी वाहतूक सुरू आहे. असा प्रकार कधीच घडला नव्हता. बेकायदेशीर पैशाची मागणी करणे गैर असून हातावरचे पोट असलेल्या टॅक्सीचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. - स्वप्ना संत, गृहिणी  
 
गफ्फारने कुर्ला येथुन गुंड आणले असून त्यांच्यामार्फत पैशासाठी आमच्यावर दबाव टाकला जात आहे. - सद्दाम शेख , टॅक्सीचालक
 
माझी टॅक्सी अंधेरीच्या गुंदवली येथे असताना गफ्फारच्या गुंडांनी टॅक्सीची चावी जबरदस्ती काढुन घेत पोलिसांना कारवाई करण्यास लावली. त्याची दादागिरी वाढली असुन त्यापासून आम्हाला संरक्षण मिळावे व आम्हाला नियमित टॅक्सी चालविण्याची परवानगी मिळावी. -माविया पटेल, टॅक्सीचालक 
 
मी कोणाकडेही पैशाची मागणी केलेली नाही. उलट टॅक्सीवाले प्रमाणित प्रवासी संख्येपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक विभागाकडुन कारवाई होत आहे. संघटनेचा पदाधिकारी म्हणून वाहतूक विभाग मला बोलवून टॅक्सीचालकांना कायद्याचे पालन करण्यास सांगतात. ते होत नसल्यानेच कारवाई केली जात आहे. त्यात माझा सहभाग नाही.   गफ्फार पींडारे, शिवसेनेच्या महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचा शहर संघटक
 
 
 
 
 
 
 

Web Title: Taxicaber's suicide attempt to ward off the demand of the taxi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.