राज्यात तीन वर्षांत टीबीने घेतले २० हजारावर बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 04:12 AM2018-03-01T04:12:23+5:302018-03-01T04:12:23+5:30
राज्यात २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत क्षयरोगाने (टीबी) तब्बल २० हजार २१३ लोकांचा मृत्यू झाला. क्षयरोग नियंत्रणाचा राज्यात बोजवारा उडाला असून, ‘टीबी हारेगा देश जितेगा’ ही जाहिरात महाराष्ट्रासाठी पोकळच ठरली असल्याची टीका आज विधानसभेत करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत क्षयरोगाने (टीबी) तब्बल २० हजार २१३ लोकांचा मृत्यू झाला. क्षयरोग नियंत्रणाचा राज्यात बोजवारा उडाला असून, ‘टीबी हारेगा देश जितेगा’ ही जाहिरात महाराष्ट्रासाठी पोकळच ठरली असल्याची टीका आज विधानसभेत करण्यात आली.
राज्यात क्षयरोगाचा प्रादूर्भाव वाढत असल्यासंदर्भात पराग अळवणी व अन्य सदस्यांनी आज लक्षवेधी सूचना मांडली होती. तिच्या लेखी उत्तरात क्षयरोगाने तीन वर्षांत २० हजार २१३ बळी घेतल्याची कबुली सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली. २०१५ मध्ये ७६३० (त्यात मुंबई १४५९), २०१६ मध्ये ६८८४ (मुंबई १२४०) आणि २०१७ मध्ये ५६९९ (मुंबई ९६३) असे मृत्यू झाले. क्षयरोग नियंत्रणाबाबत सरकारची यंत्रणा कुचकामी ठरली असल्याची टीका माजी मंत्री एकनाथ खडसे, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, नसीम खान, सपाचे अबू आझमी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी केली. भाजपाचे डॉ.राहुल आहेर, अतुल भातखळकर, शिवसेनेचे सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.
क्षयरोगासंदर्भात अधिकचे संशोधन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या रोगाच्या तपासणीसाठी मुंबईत पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून त्यापैकी तीन सुरू असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले.
फ्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी चारसुत्री पद्धतीने कार्यक्रम राबविला जात आहे.
मुंबई शहरात पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये क्षयरुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रदुषणामुळे होणाºया क्षयरोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमून त्याद्वारे तापसाणी करण्यात येईल. बुलढाण्याचे क्षयरोग रुग्णालय येत्या सहा महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल. असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरात अधिक रूग्ण-
मुंबई शहरात पूर्व व पश्चिम उपनगरात क्षयरूग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले, प्रदुषणामुळे होणाºया क्षयरोगाच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमून त्याद्वारे तपासणी करण्यात येईल.