टीसी-सीबीआय अधिका-यांमध्ये ‘फ्री स्टाईल’
By Admin | Published: January 16, 2015 06:10 AM2015-01-16T06:10:20+5:302015-01-16T06:10:20+5:30
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केलेला दंड स्वत:च्या खिशात भरणारे तीन टीसी गजाआड झाले.
मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केलेला दंड स्वत:च्या खिशात भरणारे तीन टीसी गजाआड झाले. टिळकनगर रेल्वे स्थानकात गुरुवारी पहाटे ६च्या सुमारास सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान टीसींनी सीबीआय अधिकाऱ्यांना मारहाण करून पळ काढला. याबद्दल त्यांच्याविरोधात वडाळा रेल्वे ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अमितकुमार सिंग (२८), विजय व्होडा (३९), नरेश कुमार (३९) अशी अटक झालेल्या टीसींची नावे आहेत. हे तीन टीसी गेल्या अनेक दिवसांपासून टिळकनगर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर होते. विनातिकीट प्रवास करणाऱ्या किंवा मालवाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांना ते अडवत. त्यांच्याकडून दंडही वसूल करीत. मात्र त्या दंडाची पावती देत नसत. जमा झालेले पैसे या तिघांच्या खिशात जात असत. या घोटाळ्याची माहिती सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. सीबीआय अधिकाऱ्यांनी पहाटेच टिळकनगर रेल्वे स्थानकात सापळा रचला.
नेहमीप्रमाणे आरोपी टीसी स्थानकात आले. त्यांनी प्रवाशांना पकडले. दंडाची रक्कम खिशात भरू लागले. हे पाहून सीबीआय अधिकाऱ्यांनी या तिघांना घेराव घालून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिघांनी सीबीआय अधिकाऱ्यांवर हात उचलला. आरोपी टीसींनी सीबीआय अधिकाऱ्यांना मारहाण करून पावत्या, प्रवाशांकडून उकळलेले पैसे तिथेच फेकून पळ काढला. तसेच पळतापळता त्यांनी स्वत:चे कपडेही फाडले. मात्र सीबीआय अधिकाऱ्यांनीही पाठलाग करून तिघांना पकडले.
सीबीआयने या तिघांविरोधात लाचखोरीचा गुन्हा नोंदविला. तसेच वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार वडाळा पोलिसांनी आरोपी टीसींविरोधात स्वतंत्र गुन्हा नोंदविला. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद धावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन्ही आरोपी सीबीआयच्या ताब्यात आहेत. (प्रतिनिधी)