टीडीसीसी बँकेला रोज २० कोटींचा पुरवठा
By admin | Published: June 7, 2017 03:55 AM2017-06-07T03:55:38+5:302017-06-07T03:55:38+5:30
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांना अत्यल्प रकमेच्या पुरवठ्यामुळे लाखो खातेदारांना त्याचा फटका बसला.
सुरेश लोखंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांना अत्यल्प रकमेच्या पुरवठ्यामुळे लाखो खातेदारांना त्याचा फटका बसला. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करून रोकड तुटवड्याची समस्या उघड केली होती. या वृत्ताची दखल घेऊन लिड बँकेने प्रयत्न करून ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेला १५ ते २० कोटी रुपयांचा रोज पुरवठा होत असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील ४५ एमटीएम आणि शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करणे सुलभ झाले आहे.
जिल्ह्यातील बँकांमध्ये सुमारे २०० ते २५० कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल होते. पण, रोकड तुटवड्यामुळे बँक ग्राहकांचे हाल झाले. जिल्ह्यातील एक हजार १५० एटीएम बंदावस्थेत होते. पण, त्यापैकी बहुतांश एटीएम आता सुरू आहेत. त्यामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भरणा रोज होत आहे. यानुसार, टीडीसीसी बँकदेखील त्यांचे ठाणे, पालघर जिल्ह्यातील ४५ एटीएम लवकरच सुरू करणार आहेत ्रअसे टीडीसीसीचे सीईओ भगीरथ भोईर यांनी सांगितले.
टीडीसीसीच्या सुमारे १०१ शाखा आहेत. त्यांची रोज सुमारे २५ ते ५० कोटींची उलाढाल आहे. पण, केवळ दीड ते दोन कोटी रुपये दैनंदिन व्यवहारासाठी मिळत असत. पण, आता २० कोटी रुपयांचा पुरवठा होत असून त्यातून बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा भोईर यांनी केला.
प्राप्त रक्कमेतून शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचा पुरवठा
जिल्ह्यातील कृषी विकास सहकारी संस्थांच्या ७८ लाख ६२९ शेतकऱ्यांना ४११ कोटी १६ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज टीडीसीसीने मंजूर केलेले आहे. प्राप्त होणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांनादेखील पीककर्जाच्या रकमा दिल्या जात आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून फारसे सहकार्य झाले नाही. मात्र, अन्य बँकांकडे गुंतवलेली रकम टीडीसीसी घेत असल्यामुळे बँकेतील गंगाजळी वाढली आहे. त्यातून दैनंदिन व्यवहार, पीककर्ज आणि अन्य व्यवहार सुरळीत झाले आहेत.