समन्वयाचे चहापाणी!
By Admin | Published: February 25, 2015 02:50 AM2015-02-25T02:50:06+5:302015-02-25T02:50:06+5:30
भाजपा-शिवसेनेचे नेते समन्वयाकरिता सह्याद्री अतिथीगृहात चहापान करीत असताना नवी दिल्लीत भूसंपादन विधेयकावरून या दोन्ही
मुंबई : भाजपा-शिवसेनेचे नेते समन्वयाकरिता सह्याद्री अतिथीगृहात चहापान करीत असताना नवी दिल्लीत भूसंपादन विधेयकावरून या दोन्ही पक्षातील मतभेद तीव्र झाल्याने मुंबईत समन्वय, दिल्लीत गोंधळ असे विसंगत चित्र मंगळवारी दिसले.
भाजपा-शिवसेनेच्या समन्वय समितीला अखेर मंगळवारी सायंकाळी मुहूर्त लाभला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते व खासदार अनिल देसाई हे समन्वय समितीचे सदस्य सह्याद्री अतिथीगृहात चहाचे घुटके घेत महामंडळांवरील नियुक्त्या, जिल्हा व तालुका स्तरावरील समित्या, राज्यमंत्र्यांचे अधिकार, निर्णय प्रक्रियेतील सेनेचा सहभाग यावर चर्चा करीत होते. त्याचवेळी भूसंपादन विधेयकातील शेतकरी विरोधी तरतुदींमुळे नाराज झालेल्या शिवसेनेने रालोआच्या या विषयावरील बैठकीवर बहिष्कार घातला होता.
समन्वय समितीच्या बैठकीत भाजपाने शिवसेनेच्या मुखपत्रातून वरचेवर नरेंद्र मोदी व मुख्यमंत्र्यांवर केल्या जाणाऱ्या टीकेबाबत नापसंती व्यक्त केल्याचे समजते. तर शिवसेनेने सरकारला पाठिंबा दिल्यापासून भाजपाच्या एकाही नेत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली नाही, ही बाब सेनेने नमूद केले. सरकारचे निर्णय वृत्तपत्रातून कळतात, अशी नाराजीही सेना नेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता ४ मार्च रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे हे ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)