कॉफीपेक्षा चहा जादा दरात; व्हेज बिर्याणी केवळ २५ रुपयांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 09:27 AM2023-04-08T09:27:19+5:302023-04-08T09:27:46+5:30
वर्षा-सागर बंगल्यावरील खानपान सेवेचे रेट कार्ड आले समोर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एरवी कोणत्याही हॉटेलमध्ये वा टपरीवर चहापेक्षा कॉफी महाग असते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मात्र चहापेक्षा कॉफी स्वस्त आहे. या दोन्ही बंगल्यांवर खानपान सेवा पुरविण्यासाठी दिलेल्या कंत्राटात विविध खाद्यपदार्थांचे जे दर नमूद केले आहेत त्यावरून ही बाब लक्षात येते.
शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून रात्री एक-दीडपर्यंत लोकांची ‘वर्षा’वर गर्दी असते. सागर बंगल्यावरही सकाळपासून हेच चित्र बघायला मिळते. असे असले तरी ‘वर्षा’वर खानपान सेवेचा वार्षिक खर्च साडेतीन कोटी रुपये गृहीत धरण्यात आला आहे. तर सागर बंगल्यावरील हाच खर्च वर्षाकाठी दीड कोटी रुपये गृहीत धरून कंत्राट देण्यात आले आहे. आता या दोन्ही बंगल्यांवर खानपान सेवेसाठी दोन वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे. ते ९ एप्रिल २०२५ पर्यंत असेल.
या आधी काय घडले?
वर्षा बंगल्याचे चार महिन्यांचे खानपानाचे बिल २ कोटी ३८ लाख रुपये आले होते असा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रपरिषदेत केला होता. १ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळातील हा खर्च असल्याचे पवार यांनी माहिती अधिकाराचा दाखला देऊन म्हटले होते.
त्यावर, राज्यभरातून येणाऱ्या सामान्यांना साधा चहाही पाजायचा नाही का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर कोणी जायचे नाही तरी वर्षाकाठी ३४ लाख रुपये चहापानावर कसे काय खर्च झाले, असा प्रतिसवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता.
चहा, कॉफीचे दर
टपरीवर कटिंग चहा १० रुपयात तर कॉफी १५ रुपयात मिळते. ती साधारणत: ५० एमएल इतकी असते. मात्र, वर्षा, सागर बंगल्यावर पुरवठादार हा १२५ एमएल चहा १८ रुपयांना, तर तेवढीच कॉफी मात्र १३ रुपयांत पुरविणार आहे. शीतपेयाची ३०० एमएलची बाटली बाहेर बाजारात किमान २० रुपयांत मिळते पण या बंगल्यांवर पुरवठादार ती केवळ १५ रुपयांत पुरविणार आहे.
निविदा काढूनच हे कंत्राट दोन वेगवेगळ्या पुरवठादारांना देण्यात आले. पदार्थांचा योग्य दर्जा राखला नाही तर कंत्राट रद्द करण्याचे अधिकार राज्य सरकारला असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र इतक्या कमी दरात पुरवठा करणे पुरवठादारास कसे परवडते, असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. पुरवठादारांना हे दर परवडतात तर मग हॉटेलवाल्यांना का नाही, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
दोन्ही बंगल्यांवरील पदार्थांचे रेट कार्ड
- दही मिसळ १५ रुपये
- इडली २८ रुपये (२ नग)
- सांबारवडा २८ रुपये (२ नग)
- दहीवडा १५ रुपये (२ नग)
- साबुदाणा वडा १५ रुपये (२ नग)
- व्हेज कटलेट १५ रुपये (२ नग)
- चीज सँडविच २० रुपये
- चिकन सँडविच २० रुपये
- व्हेज सूप १८ रुपये
- नॉनव्हेज सूप २२ रुपये
- व्हेज बिर्याणी २५ रुपये
- नॉनव्हेज बिर्याणी ३५ रुपये
- पावभाजी २२ रुपये