मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आता चहा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 06:17 PM2018-03-28T18:17:56+5:302018-03-28T23:17:04+5:30
गेल्या आठवड्यात मंत्रालयामधील उघडकीस आलेल्या उंदीर घोटाळ्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात होणारा चहा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या माहितीनुसार हा घोटाळा उघडकीस आणला आहे.
मुंबई - गेल्या आठवड्यात मंत्रालयामधील उघडकीस आलेल्या उंदीर घोटाळ्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात होणारा चहा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या माहितीनुसार हा घोटाळा उघडकीस आणला आहे. याबद्दल अधिक माहिती देताना संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी कोणत्या प्रकारची चहा पितात किंवा पाहुण्यांना पाजतात, त्यात असे काय टाकले जाते ? तेच कळत नाही. आजच्या काळात आपण ग्रीन टी, लेमन टी, हर्बल टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे प्रकार ऐकलेले आहेत.
मुख्यमंत्री कदाचित नवीन प्रकारची सोन्याची चहा पित असतील किंवा पाजत असतील हाच मोठा प्रश्न आहे ?. माहितीच्या अधिकाराच्या पत्रकात असे दिसून येत आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात चहा-पाण्यावर होणाऱ्या खर्चामध्ये गेल्या २ वर्षांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. २०१५-१६ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात ५८ लाख रुपये चहावर खर्च झाले. तर २०१७-१८ मध्ये हा खर्च वाढून ३.४ कोटी इतका झाला. चहा-पाण्याच्या खर्चामध्ये ५७७% इतकी प्रचंड वाढ झाली. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात रोज १८,५०० कप चहा प्यायली जाते. हे अगदी कोणालाही न पटण्यासारखे आहे. एकीकडे रोज महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे चहावर होणा-या खर्चातही ५७७% इतकी वाढ केली जाते. हा एक खूप मोठा घोटाळा आहे. भाजपा सरकार हे घोटाळ्याचे सरकार आहे.
संजय निरुपम पुढे म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते स्वतः एकेकाळी चहा विकायचे असे मोठ्या अभिमानाने सांगतात. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा हा वारसा इतका पुढे घेऊन जातात की तो चहा सर्वसामान्य चहाच्या टपरीवर विकता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चहाच्या नावावर देश लुटायला बसलेले आहेत. गेल्याच आठवड्यात उंदीर मारण्याच्या आकडेवारी वरून विरोधकांसमोर सरकारचे नाक कापले गेले आणि आता हा नवीन घोटाळा समोर आला आहे. घोटाळा मग तो उंदीर घोटाळा असो किंवा चहा घोटाळा असो, मला एकच सांगायचे आहे. यामध्ये सर्वसामान्य करदात्या नागरिकांची लूट होत आहे. सर्वसामान्यांचा पैसे लुटला जात आहे आणि यासाठी या देशाची आणि महाराष्ट्राची जनता भाजप सरकारला कधीच माफ करणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.