‘भिम’ अ‍ॅप शिकवा, पैसे कमवा!

By admin | Published: April 15, 2017 05:45 AM2017-04-15T05:45:50+5:302017-04-15T05:45:50+5:30

देशाची वाटचाल डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरू असून देशातील प्रत्येक गरिबाला डिजिधन हे ‘निजीधन’ वाटेल, असा विश्वास व्यक्त करत तरुणांसाठी ‘भिम अ‍ॅप शिकवा व पैसे कमवा’

Teach 'Bhim' app, earn money! | ‘भिम’ अ‍ॅप शिकवा, पैसे कमवा!

‘भिम’ अ‍ॅप शिकवा, पैसे कमवा!

Next

नागपूर : देशाची वाटचाल डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरू असून देशातील प्रत्येक गरिबाला डिजिधन हे ‘निजीधन’ वाटेल, असा विश्वास व्यक्त करत तरुणांसाठी ‘भिम अ‍ॅप शिकवा व पैसे कमवा’, अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. तसेच, कोराडी येथील तीन नव्या वीजनिर्मिती युनिटचे लोकार्पण, ‘भिम आधार अ‍ॅप’च्या लोकार्पणासह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. डिजिधन योजनेअंतर्गत लकी ग्राहकांना त्यांनी पुरस्कारही प्रदान केले.
यावेळी मोदी यांनी ‘डिजिटल इकॉनॉमी’चे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, पूर्वीच्या काळातही चलन बदलताना त्याला विरोध झाला, पण बदल स्वीकारले गेले. आता तर डिजिटल क्रांतीमुळे पर्यायी व सुरक्षित व्यवस्था उपलब्ध आहे. नोटा छापणे, त्या सुरक्षित पोहचविणे यावर हजारो कोटी खर्च होतात. एका एटीएमच्या सुरक्षेसाठी पाच-पाच पोलीस लागतात. हा सर्व खर्च वाचला तर हजारो गरिबांची घरे बांधता येतील. डिजिधनच्या माध्यमातून येत्या काळात त्या दिशेने पावले टाकली जातील. पेपरलेस व प्रिमायसेस लेस बँकिंगला प्रोत्साहन दिले जाईल. आपला मोबाईल ही आपली बँक बनेल. शिवाय, भिम आधार अ‍ॅपच्या माध्यमातून अंगठा स्कॅन करून व्यवहार होतील. एकेकाळी अशिक्षितपणाची निशाणी असलेला अंगठा आता शक्तीचे केंद्र बनला आहे. जगातील अद्यावत देशांमध्ये ही व्यवस्था नाही, ती आता भारत वापरू लागला आहे. ही व्यवस्था त्यांच्या देशात सुरू करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती आफ्रिकन देशांनी केल्याचे सांगत जगातील मोठी विद्यापीठे भीम आधार अ‍ॅपचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतील, तो दिवस दूर नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाबासाहेबांनी ज्या भूमीवर बौद्घधम्माची दीक्षा घेतली, त्या नागपुरातून भीम आधार अ‍ॅपचा शुभारंभ होतोय ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठीतून भाषणाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ‘धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य ज्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले त्या भूमीला माझा प्रणाम’ असे म्हणत त्यांनी दीक्षाभूमीला नमन केले. मोदींनी मराठीतून सुरुवात केल्याने उपस्थितांनी मोदी...मोदी...म्हणत उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

नेमकी काय आहे भिम अ‍ॅप योजना...
पंतप्रधान मोदी यांनी तरुणांसाठी एक नवी योजना जाहीर केली. ते म्हणाले, भीम अ‍ॅपमध्ये ‘रेफरल’ असा पर्याय आहे. तो वापरून तुम्ही जर एखाद्याला भिम अ‍ॅप शिकवले व त्याने त्याचा वापर करीत तीन व्यवहार केले, तर त्या प्रत्येक व्यक्तीमागे तुमच्या खात्यात दहा रुपये जमा होतील.
एका दिवसात तुम्ही २० लोकांना ‘भिम’शी जोडले तर तुम्हाला २०० रुपये मिळतील. तुम्ही एवढे पैसे कमवाल की आई-वडिलांकडे पैसे मागावे लागणार नाहीत. १४ एप्रिल ते १४ आॅक्टोबरपर्यंत ही योजना सुरू राहील.
व्यापाऱ्याने दुकानात भिम अ‍ॅपवरून व्यवहार केले
तर त्यालाही ठराविक व्यवहारांनंतर २५ रुपये मिळतील. त्यामुळे व्यापाऱ्यांना भेटा. मला १० रुपये तर तुला २५ रुपये मिळतील, असे सांगा व पैसे कमवा. असे ते म्हणाले.

दीक्षाभूमीवर मोदींची ध्यानसाधना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थिकलश आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर अस्थिकलशासमोर पाच मिनिटे त्यांनी ध्यान साधना केली.
यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले,
राजेंद्र गवई आदींनी बाबासाहेबांना आदरांजली वाहली.

लातूरच्या श्रद्धाला एक कोटीचे बक्षीस
डिजिधन योजनेंतर्गत लातूर शहरातील श्रद्धा मेंगशेट्टे ही तरुणी एक कोटी रुपयांच्या महासोडतीची विजेती ठरली. नव्या मोबाईलसाठी मासिक १५९० रुपयांचा हप्ता
रुपे कार्डद्वारे आॅनलाईन भरून केलेल्या व्यवहाराद्वारे ती विजेती ठरली आहे.
श्रद्धा सध्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असून तिचे वडील किराणा दुकान चालवितात. व्यापाऱ्यांसाठी असलेल्या डिजिधन व्यापार योजनेंतर्गत २५ लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक ठाणे येथे छोटे ब्युटी पार्लर चालविणाऱ्या रागिणी राजेंद्र उतेकर यांना मिळाले.

या योजनांचा शुभारंभ
व भूमिपूजन
- कोराडी वीज प्रकल्पातील तीन नव्या युनिटचे राष्ट्रार्पण
- ट्रिपल आयटी नागपूरचे भूमिपूजन
- आयआयएम नागपूरचे भूमिपूजन
- एम्स नागपूरच्या भवनाचे भूमिपूजन
- प्रधानमंत्री आवास योजनेचे भूमिपूजन
- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी’ या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन
- भिम आधार अ‍ॅपचा शुभारंभ
- डिजिधन योजनेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण

Web Title: Teach 'Bhim' app, earn money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.