मुलांना जीवनाचे ‘पॅकेज’ शिकवावे
By admin | Published: April 15, 2015 12:52 AM2015-04-15T00:52:19+5:302015-04-15T00:52:19+5:30
पाल्याने मोठे झाल्यावर इंजिनिअर, डॉक्टर व्हावे. खूप मोठे पॅकेज मिळते, बंगला, गाडी या गोष्टी मिळतात, हे संस्कार मुलाच्या मनावर पालकांकडूनच नकळतपणे बिंबविले जातात.
पुणे : पाल्याने मोठे झाल्यावर इंजिनिअर, डॉक्टर व्हावे. खूप मोठे पॅकेज मिळते, बंगला, गाडी या गोष्टी मिळतात, हे संस्कार मुलाच्या मनावर पालकांकडूनच नकळतपणे बिंबविले जातात. आज समाजात शिक्षणाकडे ‘पॅकेज’ म्हणून पाहण्याची मानसिकता तयार झाली आहे. या पॅकेजपेक्षा जीवनाचे ‘पॅकेज’ कसे असले पाहिजे, याचे संस्काररूपी बाळकडू पालकांकडून मुलांना दिले गेले पाहिजे, असा मूलमंत्र लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी मंगळवारी पालकांना दिला.
आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘लक्ष्मी-वासुदेव’ स्त्री-शक्ती गौरव पुरस्कार वितरणाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना ‘कलाभूषण’, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना ‘समाजभूषण’ तर उषामावशी कुलकर्णी यांना ‘अर्थभूषण’ व ज्येष्ठ शास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांना ‘विज्ञानभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २५ हजार रुपये, सरस्वतीचे सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या प्रसंगी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर व कार्यकारी विश्वस्त अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते.
हा मातृशक्तीचा केवळ विजय नव्हे, तर गौरव असल्याचे सांगून महाजन पुढे म्हणाल्या, ‘‘कोणत्याही संकटाला भिडण्याची ताकद ही स्त्रीमध्ये असते. बायको गेल्यानंतर आता मी एकटे कसे जगणार? घर कोण सांभाळणार? ही गोष्ट नवऱ्याला सतावते; पण बाईचा नवरा तिशीमध्ये गेल्यानंतरही पोटातल्या अर्भकाला एकटी जिद्दीने ती मोठ करते. याला म्हणतात मातृशक्ती. मुलावर योग्य प्रकारे संस्कार करण्याचे काम हे आईचेच असते. त्यामुळे मुलाला तू मोठेपणी कोण होणार? हे जेव्हा विचारले जाते, तेव्हा आईचे उत्तर खूप महत्त्वपूर्ण ठरते. शिक्षणाच्या पँकेजपेक्षा जीवनाचे पॅकेज काय असावे, ते मुलांना शिकविले पाहिजे.’’
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळाला असला, तरी माझ्यातील स्त्रीशक्तीचा केलेला सन्मान मला जास्त मोलाचा वाटतो. स्त्री म्हणजे दुर्गा नव्हे, तर मृदू, कोमल, त्यागी ही तिच्या शक्तीचीच रूपे आहेत. संगीत आणि नृत्यातील आशय समृद्ध करण्यात स्त्रीचा मोठा वाटा आहे.’’
सिंधूताई सपकाळ यांनी आईची महती खूप मोठी असून, वडील हे रानातला दिवा असतील तर आई त्या दिव्यातील अखंडपणे प्रज्वलित होणारी ज्योत असल्याची भावना व्यक्त केली.
उषामावशी आणि रोहिणी गोडबोले, डॉ. शंकर अभ्यंकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अपर्णा अभ्यंकर यांनी स्वागत केले.
पुरस्कार वितरण समारंभापूर्वी ‘मातृवंदना’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर झाला. (प्रतिनिधी)
जगात आज प्रत्येक राष्ट्रामध्ये मंदिरे आहेत; पण भारतच असा देश आहे, जिथे पृथ्वीला माता संबोधले जाते. म्हणून जगभरातल्या लोकांना भारताबद्दल विशेष अभिमान वाटतो. संतांचे तत्त्वज्ञान हा आपल्या जगण्याचा पाया आहे; त्यामुळे संत विद्यापीठ व्हावे ही राष्ट्राची गरज आहे
- सुमित्रा महाजन, लोकसभा सभापती