उन्मत्त सरकारला धडा शिकवा
By admin | Published: April 26, 2017 01:43 AM2017-04-26T01:43:49+5:302017-04-26T01:43:49+5:30
सर्व बाजूंनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आणि सत्तेमुळे उन्मत्त झालेल्या राज्यातील सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
कोल्हापूर : सर्व बाजूंनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आणि सत्तेमुळे उन्मत्त झालेल्या राज्यातील सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पार्टी या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवारपासून कोल्हापूर येथून सुरुवात झाली. प्रारंभी शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास जन्मस्थळास भेट देऊन, कुलस्वामिनी अंबाबाईला कर्जमाफीसाठी साकडे घालण्यात आले. त्यानंतर, दसरा चौकात जाहीर सभा झाली. या वेळी सर्वच वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. चव्हाण पुढे म्हणाले, सरकारने सुरुवातीपासून या संघर्षयात्रेची टिंगल केली. शेतकऱ्यांपेक्षा शहरातील ग्राहकांची संख्या अधिक असल्याने मतांचे राजकारण केले जात आहे. म्हणूनच साखरेला चांगला भाव मिळणार, याची चिन्हे दिसत असताना, पाच लाख टन कच्ची साखर आयात केली गेली. लाखो क्विंटल तूर आता मराठवाड्यात खरेदीअभावी पडून आहे. कांदा, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकरी सर्वच बाजूंनी अडचणीत आला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होत असताना, महाराष्ट्रावर हा अन्याय कशासाठी? मंत्रालयात दाद मागायला येणाऱ्या शेतकऱ्याला झोडपणाऱ्या या सरकारला जाब विचारण्यासाठी, खाली खेचण्यासाठी आता पेटून उठा, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही आणि सरकारने कांद्याला प्रतिकिलो एक रुपया अनुदान दिले आहे. तूर खरेदी केंद्रे बंद केली आहेत. पेट्रोलचे दर वाढविले आहेत. वीजदरात वाढ केली आहे; त्यामुळे आता तेथे आंदोलने उभारावी लागतील. आता यापुढचा टप्पा म्हणजे कर्जमाफी न देणाऱ्या सरकारच्या मंत्रालयाला घेराव घातला जाईल.’ यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, प्रवीण गायकवाड यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री जयवंतराव आवळे, हसन मुश्रीफ, रोहिदास पाटील, आमदार मोहन कदम आदी उपस्थित होते.