वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 03:33 AM2024-10-13T03:33:10+5:302024-10-13T03:34:10+5:30

जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्याचे आपले स्वप्न असून, त्यासाठी संधी द्या, असे आवाहन राज यांनी दसऱ्यानिमित्त पॉडकास्टद्वारे जनतेशी संपर्क साधताना केले.

Teach lesson to alliances Appeal of MNS President Raj Thackeray | वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन

वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : गेली अनेक वर्षे तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना आणि विशेषत: गेल्या पाच वर्षांत वेड्यावाकड्या युती, आघाड्या करून तुमच्या मतांशी प्रतारणा कणाऱ्यांचा यावेळच्या विधानसभा निवडणुकीत वचपा काढा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले. 

 जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्याचे आपले स्वप्न असून, त्यासाठी संधी द्या, असे आवाहन राज यांनी दसऱ्यानिमित्त पॉडकास्टद्वारे जनतेशी संपर्क साधताना केले. ते म्हणाले की, दरवेळी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते, फ्लायओव्हर बांधणे ही प्रगती नसते. प्रगती मेंदूतून व्हावी लागते, समाजाची व्हावी लागते. परदेशांनी प्रगती साधली आपण अजूनही चाचपडतोच आहोत. 

प्रगतीच्या थापा अनेकांनी मारल्या; पण तुम्ही त्यांच्याविषयी राग व्यक्त करताना दिसत नाही, उलट त्याच त्याच माणसांना निवडून देता पश्चातापाचा हात कपाळावर मारत राहता. यावेळी  बेसावध राहू नका, शमीच्या झाडावरची शस्रे काढा, ही क्रांतीची वेळ आहे, ही वचपा घेण्याची वेळ आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

मतदानाच्या वेळी तुमची  शस्त्रे जागरूकपणे वापरा
पांडवांनी शमीच्या झाडावर शस्रे ठेवली होती, तुम्ही ऐन मोक्याच्या वेळी शस्रे झाडावर नेऊन ठेवता. जे मतदानाचे शस्र तुमच्या हातात आहे ते मतदानाच्या दिवशी न वापरता, या सगळ्यांना शिक्षा न करता तुम्ही तुमच्याजवळची शस्रे निवडणुकीनंतर बाहेर काढता आणि या सगळ्या लोकांवर बोलत राहता. 

मतदानाच्या दिवशी जातीपातीचा विचार करून देश उभा राहत नसतो. आता पुन्हा संधी आली आहे, उद्याच्या निवडणुकीत क्रांती करा, आतापर्यंत ज्यांना तुम्ही सांभाळले ते तुमच्या मतांशी प्रतारणा करत आले. तुम्हाला गृहीत धरले गेले, हे दरवेळी जे गृहीत धरणे आहे त्यानेच महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. यावेळी तरी परिस्थिती बदला असेही राज म्हणाले. 
 

Web Title: Teach lesson to alliances Appeal of MNS President Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.