कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा - उद्धव ठाकरे
By admin | Published: April 12, 2017 03:34 PM2017-04-12T15:34:53+5:302017-04-12T15:36:13+5:30
कुलभूषण जाधव प्रकरणी बोलताना पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवला पाहिजे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - कुलभूषण जाधव प्रकरणी बोलताना पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवला पाहिजे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या मराठी कलाकारांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. "कुलभूषण जाधव यांच्याबाबत फक्त पत्रव्यवहार करुन काही होणार नाही. पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवला पाहिजे", अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंना शिवसेना-भाजपा युती ‘व्हेंटिलेटर’वर आहे का, असा प्रश्न विचारला असता, ‘शिवसेना-भाजपा युती ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहे,’ असं मिश्किल उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
व्हेंटिलेटर, कासव यासारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवली असून चित्रपटातील कलाकारांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक कलाकार यांचं कौतुक शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. या चित्रपटांचा एक महोत्सव एप्रिल महिन्याच्या अखेरीस शिवसेना चित्रपट शाखेच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येईल.
64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. ‘कासव’ हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, त्याला सर्वोच्च ‘सुवर्णकमळ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाने दिग्दर्शनासह तब्बल चार पुरस्कार मिळविले आहेत आणि दशक्रिया या चित्रपटाला ‘दशक्रिया’ सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेसह सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी चित्रपटाला पाचव्यांदा ‘सुवर्णकमळ’ पुरस्काराचा मान मिळाला आहे. या आधी ‘श्यामची आई’, ‘श्वास’, ‘देऊ ळ’ आणि ‘कोर्ट’ या चार चित्रपटांनाही ‘सुवर्णकमळ’ पुरस्कार मिळाला होता. कासव हा चित्रपट सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केला असून, तो अद्याप प्रदर्शित झालेला नाही.