शिक्षकांना पगार अन् नोकरीचीही नाही शाश्वती! शिक्षक दिनी ज्ञानदातेच रस्त्यावर, आज शाळा ठेवणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 05:52 AM2018-09-05T05:52:42+5:302018-09-05T05:53:07+5:30
पगार व नोकरीची खात्री नसल्याने बुधवार, शिक्षक दिनी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
मुंबई : पगार व नोकरीची खात्री नसल्याने बुधवार, शिक्षक दिनी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कृती समितीतर्फे ६,५०० विनाअनुदानित शाळा बंद ठेवून, ४५ हजार शिक्षक ‘शासनाची महाआरती’ करून निषेध नोंदविणार आहेत.
२००५नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू न करण्याच्या निषेधात जुनी पेन्शन हक्क समितीचे शिक्षक काळ्या फिती लावून काम करतील. मराठवाडा, विदर्भात वर्षानुवर्षे विनावेतन काम करणारे शिक्षक भीक मांगो आंदोलन करतील. अकोला, वाशिम व बुलडाण्यात ते काळ्या फिती लावून काम करतील. याआधीही या शिक्षकांनी व्यथा मांडली़ मात्र सरकारने दखल घेतली नाही़ वेळेवर वेतन मिळत नसल्याने आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी निषेध करतील.
स्वखर्चातून उभारली प्रयोगशाळा
अनेक प्रश्न असूनही हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मात्र विसरत नाहीत. त्याची दोन उदाहरणे समोर आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या सरस्वती विद्यानिकेतनच्या अध्यापिका दामिनी भिंगार्डे यांनी स्वखर्चाने फिरती प्रयोगशाळा तयार केली. जिल्ह्यातील शाळांमध्ये त्या २५ प्रयोग सादर करतात. दरवर्षी एक हजार विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रयोग सादर करीत आहेत.
शाळा बनविली डिजिटल!
अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेच्या परवाज उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी स्वत:च नऊ लाख रुपये गोळा करून शाळा डिजिटल बनविली आहे. मुख्याध्यापक अफजल हुसेन व शिक्षकांनी विद्यादानासाठी स्वत:ला वाहून घेतले. शिक्षकांनी १२ वर्गखोल्या डिजिटल केल्या.
काळा दिवस पाळणार
भीक मागून जमा झालेली रक्कम सरकारला पाठविणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष
प्रा. मनोज पाटील यांनी दिली.
शाळांवर दृष्टिक्षेप
माध्यमिक, प्राथमिक
विनाअनुदानित शाळा : ६५००
शिक्षक : ४५ हजार
विद्यार्थ्यांची संख्या : सुमारे १० लाख