शिक्षक पात्रता परीक्षा अनुत्तीर्ण शिक्षकांची नोकरी धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 11:00 PM2019-11-27T23:00:00+5:302019-11-27T23:00:01+5:30
राज्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात येणार..
पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुउत्तीर्ण असलेल्या राज्यातील शिक्षकांना आणखी एक परीक्षा देण्याची संधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एमएचआरडी)अमान्य केली आहे. त्यामुळे 31 मार्च 2019 पर्यंत टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परिणामी राज्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा ही शैक्षणिक पात्रता अनिवार्य केली.गेल्या काही वर्षांपासून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा दिली आहे.सध्या शाळांमध्ये सेवेत असणा-या शिक्षकांनी 31 मार्च 2019 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी,असे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. मात्र,अनेक शिक्षक या कालावधीपर्यंत टीईटी उत्तीर्ण उत्तीर्ण झाले नाहीत. त्यामुळे संबंधित शिक्षकांना आणखी एक परीक्षा देण्याची संधी मिळावी,अशी विनंती एमएचआरडीकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना तूर्तास सेवेतून काढू नये, तसेच या शिक्षकांचे वेतन थांबवू नये, अशा सुचनाही राज्य शासनाने दिल्या होत्या. मात्र, एमएचआरडीकडे याबाबत करण्यात आलेली विनंती अमान्य झाल्यामुळे राज्यातील टीईटी परीक्षाा अनुत्तीर्ण असणा-या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.
राज्याचे अवर सचिव स्व.य.कापडणीस यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्त व प्रार्थमिक शिक्षण संचालक कार्यालयास टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांवर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांप्रकरणी त्वरित सुनावणी घेण्यासाठी संबंधित सरकारी वकिलांशी संपर्क साधावा. तसेच यासंदर्भातील एमएचआरडीचे पत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे,असेही कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र,अल्पसंख्यांक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य आहे किंवा नाही याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे अल्पसंख्यंक शाळांमधील शिक्षकांबाबत सद्यस्थितीत कार्यवाही करू नये,असेही कापडणीस यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.
..........
टीईटी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शासन आदेशानुसार संबंधित शिक्षकांवर नियमानुसार कार्यवाही केली जाईल.- दत्तात्रय जगताप,प्राथमिक,शिक्षण संचालक ,महाराष्ट्र राज्य