शिक्षक मेळाव्यात उमेदवारीवरून जुंपली
By admin | Published: January 23, 2017 04:44 AM2017-01-23T04:44:43+5:302017-01-23T04:44:43+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कोकण विभाग शिक्षक मतदार संघात दिलेल्या उमेदवारीवरून चांगलेच घमासान पाहायला मिळत
मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कोकण विभाग शिक्षक मतदार संघात दिलेल्या उमेदवारीवरून चांगलेच घमासान पाहायला मिळत आहे. राजापूर तालुक्यातील आदर्श विद्या मंदिर वातूळ येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात रविवारी चांगलाच गोंधळ झाला. या वेळी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू हेच अधिकृत उमेदवार असून, रामनाथ मोते हे बंडखोर उमेदवार असल्याचे भगवानराव साळुंखे यांनी स्पष्ट केले.
या आधी शिक्षक परिषदेचे माजी आमदार रामनाथ मोते यांना तिकीट नाकारत, शिक्षक परिषदेने अध्यक्ष वेणुनाथ कडू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या मोते यांनी स्वतंत्रपणे अर्ज भरला. मात्र, काही बंडखोर कार्यकर्त्यांकडून मोतेच परिषदेचे अधिकृत उमेदवार असल्याचे भासवले जात असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे.
गेल्या ३० वर्षांपासून समर्पित भावनेने शिक्षक परिषदेसाठी काम करणारे कडू हेच अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रविवारी वातूळ येथील शिक्षक मेळाव्यात रामनाथ मोतेदेखील उपस्थित होते. तेव्हा शिक्षक परिषदेचे बॅनर वापरण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला?, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहात? असे विविध प्रश्न मोते यांना कार्यकर्त्यांनी विचारले. त्यावर मोते आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह माघारी परतले. मात्र, यामुळे कोकण विभागातील निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (प्रतिनिधी)