शिक्षक दिनी रस्त्यावर उतरून शिक्षकांचे आंदोलन; कोल्हापुरात विनाअनुदानित शिक्षकांची ‘महाआरती’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 03:27 AM2018-09-06T03:27:31+5:302018-09-06T03:28:38+5:30
‘जयदेव जयदेव जय भाजपा सरकार, शंभर टक्के हक्काचा द्या आम्हा पगार...’ या महाआरतीद्वारे विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे आंदोलन केले.
मुंबई : ‘जयदेव जयदेव जय भाजपा सरकार, शंभर टक्के हक्काचा द्या आम्हा पगार...’ या महाआरतीद्वारे विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी बुधवारी विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथे आंदोलन केले. राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक दिनी शाळा बंद ठेवून शिक्षक रस्त्यांवर उतरल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले.
महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. येथील कोल्हापूर विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर दुपारी साडेबारा वाजता मुख्याध्यापक, शिक्षक जमले. त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात ‘अनुदान आमच्या हक्काचे’, ‘शंभर टक्के हक्काचा पगार मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेसमोर मराठवाड्यातील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते ‘शासनाची महाआरती’ करून सर्व आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
सांगली, सातारा सोलापूरसह कोकणातही अनेक ठिकाणी आपल्या व्यथा मांडण्यासाठी शिक्षक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
... अन्यथा गांधीजयंतीपासून तीव्र आंदोलन : विक्रम काळे
आमदार विक्रम काळे म्हणाले, प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी वेळोवेळी आश्वासने दिली; पण, त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही. मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही १४०हून अधिक आंदोलने केली आहेत. आता सरकारने आमचा अंत पाहू नये. अन्यथा दि. २ आॅक्टोबरला महात्मा गांधीजयंतीपासून राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल.
नाशिकसह खान्देशातील जिल्ह्यांमध्येही शिक्षकांनी आंदोलन केले. पुण्यातही शिक्षकांनी आंदोलन केले. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले.
मराठवाड्यात भीक मांगो आंदोलन
औरंगाबाद : मराठवाड्यात अनेक ठिकाणी शिक्षकांनी भीक मांगो आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. औरंगाबाद येथे मराठवाडा कृती समितीने विभागीय आयुक्तालयासमोर दिवसभर धरणे दिले. बदली धोरणामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना तत्काळ स्थापित करण्याची मागणी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, येथे आंदोलन झाले.